Marathi News Today, 22 May: कर्नाटकमध्ये भाजपाचा पराभव झाला आहे आणि काँग्रेसचा विजय. सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. यानंतर महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. २०२४ ला राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं आपलं लक्ष्य आहे असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी महाविकास आघाडीत आम्हीच मोठा भाऊ आहोत असंही वक्तव्य केलं त्यावरही विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. तर दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढण्याचा मुद्दाही गाजतो आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत विजय आमचाच होणार हा दावा भाजपानेही केला आहे आणि महाविकास आघाडीनेही. या आणि अशा सगळ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातल्या राजकीय, सामाजिक आणि जिल्हा स्तरावरच्या बातम्या एका क्लिकवर बघायच्या असतील वाचा आमचा हा लाइव्ह ब्लॉग.
Mumbai News Today:महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला का? यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी
गोंदिया : भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रेलरने दिलेल्या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात अन्य नुकसान झाले नाही.
उकाड्याने हैराण झालेल्या पंढरपूरकर वासीयांना पावसाने दिलासा दिला. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. तालुक्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस तर शहरात हलक्या सरी कोसळल्या.
पिंपरी : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शहराध्यक्ष बदलाच्या चर्चेने वेग आला आहे. मात्र, महापालिका निवडणुकीपूर्वी बदल करायचा की नको? यावर शहर भाजपमध्ये दोन मतप्रवाह आहेत.
नागपूर : विदर्भात फक्त पर्यावरणाचीच समस्या नाही तर इतर अनेक विषय आहेत. त्यासाठी लोकांना जागृत करण्याची गरज आहे. या सर्व विषयांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी येत्या जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूर शहरात राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण परिषद आयोजित केली जाईल, अशी माहिती माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे दिली.
मुंबईः दुचाकीवरून तिघे प्रवास करत असल्यामुळे थांबण्याचा इशारा दिला असता दुचाकी चालकाने वाहतुक पोलिसालाच धडक दिल्याचा प्रकार सांताक्रुझ पूर्व येथे रविवारी रात्री घडला. या अपघातात वाहतुक पोलीस जखमी झाला असून दुचाकी चालकाविरोधात वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धुळे - कांदा उत्पादक शेतकर्यांना शेतीमाल विक्री करण्यासाठी शासनाने नाफेड व पणन केंद्र सुरु करावे, अशी मागणी करत धुळे जिल्हा भारत राष्ट्र समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले.
मुंबई: महारेरा वसूली आदेशाच्या अंमलबजावणीला अखेर वेग आला आहे. विकासकांच्या मालमत्ता जप्त करून लिलावाच्या प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरु झाली आहे.
डोंबिवली: डोंबिवली जवळील शिरढोण गावात रविवारी सकाळी एका शेतकऱ्याला गावातील चार जणांनी लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली तर कुटुंबातील सगळ्यांना मारू टाकू, अशी धमकी दिली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.
उत्तर प्रदेशातील तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला विक्रीसाठी मुंबईत घेऊन आलेल्या दाम्पत्याचा डाव टिळक नगर पोलिसांना उधळून लावत मुलीची सुटका केली आहे. रेल्वे स्थानकावरील रिक्षा चालकाने सतर्कता दाखवून पोलिसांना वेळीच याबाबतची माहिती दिली.
अंबरनाथ: संस्थेला देण्यासाठी ४० डझन आंबे हवे आहेत असे सांगून अंबरनाथमध्ये एका भामट्याने आंबे विक्रेत्याला तब्बल ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या भामट्याने आंबे विक्रेत्याकडून ४० डझन आंबे खरेदी करत ३० हजारांचा धनादेश दिला.
नागपूर : विदर्भात कोल कॉल वॉशरीज वाढत असून त्यात मोठा घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे. कोराडी-खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामुळे वायू प्रदूषण वाढले. नांदगाव- वारेगावला पुन्हा राखेची साठवणूक सुरू झाली. आता कोराडीत ६६० मेगावॅटचे दोन नवीन प्रकल्प आणून स्थानिकांचे जीवन आणखी धोक्यात टाकायचे आहे काय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
ठाणे: मुंब्रा, दिवा, कोपर येथे रेतीचे उत्खनन सुरू असल्याने भविष्यात रेल्वे मार्गाला धोका निर्माण होण्याची भिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केली असून याकडे महसुल विभागाला लक्ष देण्याची सुचना त्यांनी केली आहे.
नागपूर : “हे खरे आहे की आम्हाला (मुंबई) वीज पुरवठा करण्यासाठी प्रदूषणाचा मार मात्र तुम्हाला सहन करावा लागतो”, तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पांच्या मुद्यावर हे वक्तव्य केले.
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत जवळपास तीस हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. आता निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठ पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
ठाणे : मुंब्रा येथील अमृतनगर भागात चाळीतील घरांच्या छताला विद्युत तारेचा स्पर्ष होऊन लागलेल्या आगीत एकाच घरातील चारजण जखमी झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलींचाही सामावेश आहे.
पुणे : देवदर्शनासाठी यात्रेकरु महिलांना घेऊन निघालेल्या खासगी प्रवासी बसचालकाच्या बेदरकारपणामुळे बस उलटल्याची घटना फुलगाव-तुळापूर रस्त्यावर घडली. या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या असून बसचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा नागपूरमध्ये रामटेक जवळ मनसर, कन्हान येथे शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे राज्याचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फलक युवा सेनेतर्फे लावण्यात आले.
पिंपळगाव बसवंत: मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाटा शिवारात जवळपास दीड हजार किलो गोमांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पकडण्यात पिंपळगाव पोलिसांसह गोरक्षकांना यश आले.
पुणे : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ ध्यानात घेत महावितरणने इलेक्ट्रिक वाहनांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या चार्जिंग स्थानकांच्या उभारणीला वेग दिला आहे. पुणे परिमंडल अंतर्गत सद्यस्थितीत १५ चार्जिंग स्थानके कार्यान्वित झाली आहेत.
वर्धा : बजाज वाचनालय सभागृहात आयोजित सभेसाठी संभाजी भिडे आले असताना त्यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी, निर्माण, भारतीय बौद्ध महासभा व अन्य संघटनांनी आज केला.
बुलढाणा : खामगाव शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी कट्ट्यासह पाच जिवंत काडतुसे जप्त केली. खामगाव नजीकच्या वाडी येथील खासगी वसतिगृहात ही कारवाई करण्यात आली असून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे अग्निशस्त्र आले कुठून व त्याचा उद्धेश काय? याचा पोलीस तपास करीत आहे.
कल्याण- डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागात मुख्य वर्दळीच्या रस्त्याला बाधित ठरणारी, वाहतुकीला अडथळा ठरणारी काळुबाई मांढरादेवी मंदिरा जवळची सात माळ्याची बेकायदा इमारत जमीनदोस्त करा, असे आदेश आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी ह प्रभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कल्याण- कल्याण डोंबिवली पालिकेची मंजूर विकास योजना आणि महसूल हद्दींचे गाव नकाशे यांच्या हद्दी मिळत्या जुळत्या नाहीत. पालिकेकडून बांधकाम परवानग्या देताना शहराचे नियोजन बिघडत आहे.
चंद्रपूर : केंद्रातील भाजपा सरकारने ईडीचा दुरुपयोग करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना त्रास देणे सुरू केले आहे. हेतुपुरस्सर खोट्या गुन्ह्यात अडकवून चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे. याचा निषेध म्हणून केंद्रातील भाजपा सरकार तथा ईडीच्या विरोधात चंद्रपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
ठाणे : पावसाळ्यात महापालिकेसह सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकारी सातही दिवस २४ तास उपलब्ध असणे अपेक्षित आहे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच रस्त्यावरील गटारावर झाकण नसल्याने कोणतीही दुर्घटना झाली तर गंभीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
नागपूर: एका शिक्षिकेने आपल्या दहा वर्षीय मुलीसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही हृदयद्रायक घटना बुटीबुरीमध्ये उघडकीस आली.
नाशिक – सक्त वसुली संचलनालयच्या (इडी) माध्यमातून भाजपा सत्तेचा गैरवापर करीत असल्याची तक्रार करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सत्ताधारी भाजपाच्या कार्यशैलीमुळे देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
अमरावती : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची काही निवडक संघटना बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असून त्यांच्या या कृत्याला प्रतिबंध घालावा या मागणीसाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर रणजीत गंतूराम पवार यांच्या नेतृत्वात फासेपारधी बांधवाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
अमरावती : ‘बौद्धिक संपदा हक्क’ या विषयाचा राज्यातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत समावेश करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या माजी विभागप्रमुख डॉ. विजया संगावार यांनी दिली. हा महत्त्वाचा विषय हाती घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यातील गावदेवी भागात एका रिक्षात विसरलेला एक लाख २० हजार रुपयांचा कॅमेरा ओंकार डिंगोरे या विद्यार्थ्याला परत मिळाला आहे. कॅमेरा परत मिळाल्याने ओंकारने पोलिसांचे आभार मानले.डोंबिवली येथे ओंकार हा वास्तव्यास असून तो मुंबईतील एका महाविद्यालयात ‘बीएमएम’मध्ये शिक्षण घेत आहे.