Mumbai News Today : केंद्र सरकारने कांद्यावर भरमसाट निर्यातशुल्क लादल्यानंतर शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे. या कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसत आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. ठिक-ठिकाणी सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरु आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
Mumbai Pune News Live Today : प्रत्येक घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर…
नागपूर : शरद पवार यांनी देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यायला हवे. राहुल गांधींच्या नादाला त्यांनी लागू नये, ‘इंडिया’ ही चुकीच्या वेळेला झालेली नकारात्मक आघाडी असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी येथे केली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अकोला: विदर्भात कृषी विद्यापीठाची स्थापना होण्यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात नऊ जण शहीद झाले होते. त्यानंतर ५४ वर्षांपूर्वी अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
वर्धा: एक ते बारा ऑगस्टदरम्यान चाहूलही न देणाऱ्या पावसाने गेल्या चार दिवस हजेरी लावली. आता परत आभाळ कोरडेठाक आहे.
अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्याबाबत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून नवनीत राणा यांच्या मोबाईलवर विठ्ठलराव नावाची व्यक्ती चाकूने वार करून ठार करू, अशी धमकी देत असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील सरकारी रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणावरून मंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘तिखट’ प्रतिक्रिया उमटली आहे. ‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे’ असा थेट सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारला आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता परसली आहे.
नागपूर: महामेट्रोत नोकरी लावून देतो असे सांगत पैसे घेण्याचे प्रकार घडत आहेत. एकीकडे असे प्रकार होत असतानाच आता QR कोड स्कॅन करत किंवा लिंकच्या माध्यमाने पैसे भरल्यास महामेट्रोत नोकरी मिळते, असा दावा करणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केलं आहे. या कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांमधून संतप्त भावना उमटत आहे. राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावरती उतरून शेतकरी आंदोलन करत आहे. अशात केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नागपूर : तब्बल दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मोसमी पाऊस परतला होता, पण मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे पुढील तीन दिवस राज्यभरात पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे : औषधांसाठी रेल्वे प्रवाशांना आता स्थानकाबाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण स्थानकांवरच जनऔषधी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात ५० रेल्वे स्थानकांवर ही सुविधा सुरू होणार आहे. यात राज्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस, पिंपरी, मालाड, मनमाड, सोलापूर, नागभीड या सहा स्थानकांचा समावेश आहे.
भंडारा : शहरातील बसस्थानकासमोरील हिरणवार लॉजवर प्रेयसीसोबत रात्र घालविणाऱ्या प्रियकराचा अचानक मृत्यू झाला. सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि खळबळ उडाली. कृष्णा रायभान धनजोडे (२३) असे मृतकाचे नाव असून तो नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील केशोरी येथील रहिवासी आहे. लॉजमधून शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
वसई : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करून तरुणींचे अश्लील छायाचित्र तयार केल्याची घटना नालासोपारा पश्चिमेच्या कळंब गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी पोलिसाच्या दोन मुलांना अटक केली आहे.
पिंपरी: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीतील पाण्यावर फेसाचे थर साचले आहेत. थेरगावातील केजुदेवी बंधाऱ्याजवळ हे चित्र निर्माण झाले असून, महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेनंतर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २७ ऑगस्टला सभा होणार आहे. त्यावरून खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या गटावर टीकास्र डागलं आहे. “कोणत्याही राजकारणात अडकण्यापेक्षा महाराष्ट्रातील बळीराजा संकटात आहे. त्याच्यासाठी उपायजोयना करणे जास्त गरजेचं आहे. बळीराजासाठी काय करणार आहोत? पावसाने ओढ दिल्याने दुष्काळजन्य परिस्थिती अनेक ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे कितीही 'उत्तर सभा' झाल्या तरी त्यापेक्षा बळीराजाच्या प्रश्नांचं 'उत्तर' देणं जास्त महत्वाचं असणार आहे,” असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
पंतप्रधान कार्यालयांमार्फत (पीजी पोर्टल) प्राप्त झालेल्या तक्रारींचा ३१ ऑगस्टपर्यंत निपटारा करण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना दिले आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वच विभागातील अधिकाऱ्यांची सध्या धावपळ सुरू झाली आहे. राज्यातील नागरिकांकडून वैयक्तिक पातळीवर पीजी पोर्टलवर मोठय़ा प्रमाणावर तक्रारी केल्या जात आहेत. महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये प्रवेश नाकारला, यांपासून ते सातबाराचा उतारा मिळत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर केल्या जात असल्याचे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले