Maharashtra News Today, 22 March 2023 : यंदा मराठी नववर्ष अर्थात गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे. विशेषत: मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या अनेक भागांत काढल्या जाणाऱ्या शोभायात्रा करोनाआधीच्या वर्षांप्रमाणे पुन्हा एकदा उत्साहात काढल्या जात आहेत. ठाण्यातील शोभायात्रेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. तसेच नागपूरमध्ये अनेक ठिकाणी शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या शोभायात्रेत हजेरी लावली. याशिवाय आज रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यासंबंधित बातम्यांवरही आपली नजर असेल.
Mumbai Maharashtra News Updates : गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त CM शिंदेंनी दिल्या राज्यातील जनतेला शुभेच्छा, म्हणाले...
ज्या समाजाला स्वतःच्या दैदिप्यमान इतिहासाचा विसर पडतो. त्याला उत्तम भविष्य नसते. आपली प्राचीन सभ्यता व संस्काराला न विसरता वाटचाल असली पाहिजे. त्यामुळे नागपुरमध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सार्वजनिक स्वरूपात नववर्ष साजरा करण्याच्या सुंदर सोहळ्याचे समाधान असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.
ऐतिहासिक स्थळे ही राष्ट्राची सांस्कृतिक संपदा व जतन करण्यासारखा वारसा समजली जातात. केंद्र शासनाचा भारतीय पुरातत्त्व विभाग खास हा वारसा जपण्यासाठी स्थापन झाला आहे. त्यांच्याकडे देशातील ३ हजार ६९६ अशी स्थळे जपण्याची व त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे.
आमगाव नगरपरिषदेच्या शासनाद्वारे सर्वोच्य न्यायालयातील प्रलंबित प्रकरणामुळे नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी घरकूल, शौचालय, रोजगार आणि पाणीप्रश्नावर गुढी उभारून त्यावर समस्यांचे फलक लावून शासनाचे लक्ष वेधले.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सुवर्णनगरी जळगावात सोने खरेदीस प्रतिसाद दिसून आला. सुवर्ण खरेदीतून २० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गुढीपाडव्याला सोने खरेदीकडे अनेकांचा कल असतो.
कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे मालगाडीचे ‘कपलिंग’ तुटल्याची घटना अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे फाटकाजवळ बुधवारी दुपारी घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
राजकमल प्रकाशनाने गेल्या वर्षभरात भोपाळ, बनारस, पाटणा आणि चंडीगढ या राज्यांमध्ये पुस्तकदौरा आखला आहे. महाराष्ट्रात मुंबईत या प्रकाशनाने ग्रंथप्रदर्शनाचा पहिला मुक्काम केला आहे.
श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे चैत्र पाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक फडके रस्त्यावरील मनसेच्या मध्यवर्ति कार्यालयात हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
ठाणे: महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या वाहिन्या कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या कामामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचे लागलेले ग्रहण काही केल्या सुटत नसून लाचखोरीची परंपरा कायम आहे. १९९७ मध्ये चिंचवडच्या प्रेमलोक पार्क येथे सदनिकेची नोंदणी करण्यासाठी ३०० रुपयांच्या लाच प्रकरणाने सुरु झालेली लाचखोरी अद्यापही सुरुच आहे.
पुणे : केंद्र सरकारने मागील वर्षी १५ वर्षावरील खासगी वाहनांचे पुनर्नोंदणी शुल्क वाढवले. हे शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवूनही वाहनांची पुनर्नोंदणी होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे अजूनही नागरिकांचा कल जुन्या वाहनांकडे असल्याचे समोर आले आहे.
पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील एका माॅलमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेकडे पाहून अश्लील शेरेबाजी करणाऱ्या एका तरुणाच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे.
जागतिक नकाशावर नाव कोरलेल्या भारतातील वाघांनी विदेशी पर्यटकांना भूरळ घातली. आता तेच विदेशी पाहुणे भारतात ‘सी-२०’च्या निमित्ताने आल्यानंतर व्याघ्रदर्शनासाठी ते पेंच व्याघ्रप्रकल्पात गेले. एरवी या व्याघ्रप्रकल्पात सहजासहजी वाघ दिसत नाही, पण सातासमुद्रापलीकडून पाहुणे आल्याने असेल कदाचित बांबूच्या रांजीतून वाघांची जोडी त्यांच्यासमोर आली.
अब्दुल सत्तारांनी काल रात्री अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अब्दुल सत्तारांना टोला लगावला आहे. सत्तारांना रात्रीचं जास्त दिसतं. त्यामुळे त्यांनी रात्रीची राहणी केली. रात्रीचं दिसणारा माणून राज्याचा कृषीमंत्री आहे, हे आपलं भाग्य आहे, असं ते म्हणाले.
राज्यात आतापर्यत एक लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा आकडा असून दोन दिवसात वस्तूनिष्ठ पंचनामे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण नुकसानीची माहिती मिळेल. नुकसानग्रस्त शेतकरी हा मदतीपासून वंचि राहणार नाही, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने गुढीपाडव्याच्या दिवशी, बुधवारी रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवल्या. त्यामुळे बुधवारी मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. गुढीपाडव्यानिमित्त सुट्टी असल्याने अनेक नागरिक नातेवाईकांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडले होते.
पुण्यातील ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून काही अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला आहे. यावेळी पोलिसांनी ओशो अनुयायांवर लाठीमार केला. तसेच काही अनुयायांना ताब्यात घेतले.
जिल्ह्यातील सिरोंचा शहरात पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ असा ‘एल्बिनो कोब्रा’ आढळून आला आहे. येथील सर्पमित्र नईम शेख यांनी त्याला पकडून जंगलात सोडून दिले. या प्रकारचा कोब्रा आढळून येण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असल्याचे शेख यांनी सांगितले.
वसंतदादा साखर कारखान्याचा मद्यार्क प्रकल्प बेकायदेशीर चालविण्यात आला असून याचे लाभार्थी असलेल्या स्वप्नपूर्ती शुगरवर कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत आग्रह धरला.
बँकांकडून जास्तीत जास्त ठेवी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. यामुळे येत्या काळात त्यांना ठेवींवरील व्याज दरात वाढ करणे भाग ठरेल, असा रिझर्व्ह बँकेच्या मासिक पत्रिकेने अंदाज व्यक्त केला आहे. बँकांनी त्यांच्याकडील निधी वाढवण्यासाठी ठेवींवरील व्याज दरात मागील काही महिन्यांपासून वाढ करण्यास सुरुवात केली आहे.
नागपूरमध्ये पार पडलेल्या दोन दिवसीय सी-२० परिषदेत देशविदेशातील महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला. परिषदेला उपस्थित भारतासह २६ देशांच्या एकूण ३५७ प्रतिनिधींपैकी तब्बल १६४ महिला होत्या. विशेष महत्त्व सी-२० समितीच्या अध्यक्षा सुध्दा एक महिला माता अमृतानंदमयी होत्या.
राज्यात मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे. विशेषत: मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या अनेक भागांत काढल्या शोभायात्रा काढण्यात येत आहेत. आमदार आदित्य ठाकरे देखील एका शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांना राज्यात शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत, याबाबत विचाण्यात आलं. यासंदर्भात बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
राज्यात मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे. विशेषत: मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या अनेक भागांत काढल्या शोभायात्रा काढण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर गिरगावमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीसह शोभायात्रा काढण्यात आली असून या शोभायात्रेत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारसह शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीकास्र सोडलं. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
जिल्ह्यातील प्रस्तावित सहा लोहखाणी रद्द करण्यात याव्या, या मागणीसाठी मागील दहा दिवसांपासून छत्तीसगड सीमेवरील तोडगट्टा गावात मोठ्या संख्येने आदिवासी आंदोलन करत आहेत. यामध्ये सूरजागड पारंपरिक इलाका समितीमधील ४० ग्रामसभा सहभागी झाल्या आहे.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच अनेक ठिकाणी पंचनामे रखडले आहेत. दरम्यान, यावरून संभाजीराजे आक्रमक झाले असून मुखमंत्र्यांनी हेलिकॉप्टरने शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. हेलिकॉप्टरने शेतपिकांची पाहणी केल्यास नुकसान किती झाले, याचा अंदाज येईल, असेही ते म्हणाले.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ (१४ भूखंडासह) घरांसाठी २१ मार्चपर्यंत अनामत रक्कमेसह ४,७८४ अर्ज सादर झाले आहेत. कोकण मंडळाच्या सोडतीला १३ दिवसांत मिळालेला प्रतिसाद पूर्वीच्या तुलनेत काहीसा कमी आहे.
‘छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्पा’अंतर्गत शीव – ठाण्याला जोडण्यात येणाऱ्या मार्गावरील ६८० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे आतापर्यंत केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिने लागणार आहेत.
राज्य सरकारने नुकताच राज्य परिवहन महामंडळच्या बसेसमध्ये महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली. याच धर्तीवर आता खासगी बसमध्ये सुध्दा महिलांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनकडून घेण्यात आला आहे.
‘तुझे वस्तीतील एका युवकाशी अनैतिक संबंध आहेत’ असा वारंवार आरोप करीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने मुलाच्या मदतीने खून केला. ही घटना कळमन्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीअंती पत्नी-मुलावर गुन्हा दाखल केला.
जी-२० परिषदेंतर्गत नागपुरात सुरू असलेल्या सी-२० परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटना आणि भाजपने वेठीस धरल्याचे चित्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून आयोजित या परिषदेचा उपयोग आपल्या विचारसरणीच्या प्रचारासाठी केल्याचा आक्षेप शहरातील जागरूक नागरिकांनी नोंदवला आहे.
रविंद्र धंगेकर म्हणाले की, "मी राजकीय जीवनात 30 वर्षापासुन असून हा सण समाजातील प्रत्येक वर्गा सोबत साजरा करीत आलो आहे. त्यामुळे आमदार झालो असलो तरी मी एका कार्यकर्त्याप्रमाणे सण साजरा करीत आहे. तसेच गुढी पाडवा सणाच्या निमित्ताने दरवर्षी एक संकल्प करीत असतो. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील 500 स्क्वेअर फुटाच्या मिळकतींना राज्य सरकार सवलत देईल हीच अपेक्षा आहे. जर त्यांनी सवलत दिली नाही. तर या विरोधात रस्त्यावर उतरून लढा उभारला जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच आज आपण कोणताही सण साजरा करताना धर्मांमध्ये कोणीही राजकारण आणू नये.तसेच इतर धर्माचा कोणीही द्वेष करू नये. अशी भूमिका त्यांनी मांडली.
मी गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या महाराष्ट्रवासीयांना शुभेच्छा देतो. सगळ्यांना नवीन वर्ष सुखा-समाधानाचं आणि आरोग्यदायी जावो, असा शुभेच्छा एकनाथ शिंदे यांनी दिल्या.