Maharashtra Breaking News : राज्यात दिवाळीनंतर निवडणुका घेतल्या जातील असे संकेत निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिले असले तरीही प्रत्यक्षात डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये या सरकारचा कार्यकाळ संपतोय. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका लांबल्या असल्याचंही बोललं जातंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. गेल्या तीन निवडणुकांमध्ये हरियाणा व महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा एकाच वेळी झाली होती. मात्र, या वेळी महाराष्ट्रातील निवडणूक जाहीर करण्यात आली नाही. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाखो बहिणींच्या खात्यावर पैसेही जमा करण्यात आले आहेत. यासह राज्यातील विविध घडामोडी एका क्लिकवर.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक), एमबीए पदवी प्रवेशासाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेनंतर बुधवारी रात्री पहिली यादी जाहीर केली.
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातून दोन महिला व २२ वर्षीय युवक अशा तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. उपजिविकेसाठी ते दोन महिन्यांपूर्वी शहरात आले.
पुणे : पूजासाहित्य विक्री करणाऱ्या तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.कार्तिकेश दशरथ राणे (वय २३, रा. वैष्णवी देवी हाईट्स, सुखसागरनगर, कोंढवा बुद्रुक) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सतीश मुरलीधर ढोले (वय ६०, रा. वैष्णवी देवी हाईट्स, सुखसागरनगर, कोंढवा बुद्रुक) यांना अटक करण्यात आली. राणे यांचा पूजासाहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. बिबवेवाडीतील शनी मंदिराजवळ त्यांचे दुकान आहे.
आरोपी ढोले आणि राणे यांचा गेल्या वर्षी दिवाळीत वाद झाला होता. शनिवारी (१७ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ढोले त्यांच्या दुकानाजवळ आले. त्याने राणे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.त्यानंतर ढोलेने राणे यांचे तोंड दाबले आणि गळ्यावर चाकूने वार केला. अचानक हल्ला झाल्याने राणे यांनी त्याला प्रतिकार केला. त्यांनी चाकू पकडला. झटापटीत राणे यांच्या अंगठ्यास जखम झाली. ढोले तेथून पसार झाला. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तपास करत आहेत.
निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरीही रिझल्ट नाही बदलू शकत. हा रडीचा डाव आहे. लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होऊ शकत नसतील तर हेच त्यांचं अपयश आहे. पैसे देऊन जिंकता येत असतं तर ते लोकसभेतच ते जिंकले असते. लोकसभेत कमी पैसे वापरले का? – सुप्रिया सुळे</p>