Marathi News Live Update : देशभर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सातत्याने एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत देशभरातील मोठ्या नेत्यांसह विविध पक्षांचे उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या बातम्यांवर आपलं लक्ष असेल. तसेच महाराष्ट्रासह देशभरातील इतर राजकीय आणि सामाजिक बातम्यांच्या आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Marathi News Live Today, 23 April 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

11:59 (IST) 23 Apr 2024
नाशिक जिल्ह्यात पाच लाख नागरिकांची टँकरवर भिस्त, लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा अन प्रत्यक्षातील स्थितीत अंतर

एप्रिलच्या मध्यावर तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला. उष्णतेच्या लाटेत पाणी टंचाईचे संकट भीषण स्वरुप धारण करीत आहे.

सविस्तर वाचा…

11:58 (IST) 23 Apr 2024
गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी; पाच जणांवर गुन्हा

मुंबई काँग्रेसचे फलक लावलेल्या दोन वाहनांतून १० ते १२ जण आले आणि त्यांनी पीयूष गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

सविस्तर वाचा…

11:57 (IST) 23 Apr 2024
‘उष्माघात टाळायचा असेल तर भरदुपारी लग्न…’

नागपूर : उपराजधानीत तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे लग्न समारंभाची वेळ भर उन्हातली नको. ती सकाळी लवकर वा दुपारनंतर ठेवावी, असे आवाहन नागपूर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.

वाचा सविस्तर…

11:55 (IST) 23 Apr 2024
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी

नाशिक : आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असताना दुसरीकडे धरणांतील जलसाठा वेगाने कमी होत आहे. जिल्ह्यातील धरणसाठा २३.८९ टक्क्यांवर आला. दोन धरणे आधीच कोरडीठाक झाली असून अन्य चार धरणे तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. अन्य सहा धरणांमध्ये २० टक्क्यांहून कमी जलसाठा आहे.

वाचा सविस्तर…

11:55 (IST) 23 Apr 2024
गोंदियात व्यावसायिक स्पर्धेतून रक्तपात; गोळीबारात वाळू व्यावसायिकाचा मृत्यू

गोंदिया : शहरात वाळू व्यवसायाशी संबंधित गोलू तिवारी याची सोमवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. शहरात व्यावसायिक गुन्हेगारांचे अड्डे झपाट्याने वाढत चालले असून, येथे व्यवसायाच्या निमित्तानं संघटित पद्धतीने रक्तपात केला जात आहे. गेल्या काही वर्षात अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली असून, यामध्ये व्यावसायिकांनी एकमेकांना स्पर्धेत पराभूत करण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबले आहेत.

वाचा सविस्तर…

11:51 (IST) 23 Apr 2024
पुणे : बेपत्ता शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांना पोलीस आयुक्तांकडून बक्षीस

पुणे : नांदेड सिटी परिसरातून बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कौतुक केले. बेपत्ता मुलगी रांजणगाव येथील महागणपती मंदिरात सापडल्यानंतर पोलिसांना तपासात मदत करून मुलीची माहिती देणाऱ्या पाचजणांना पोलीस आयुक्तांनी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 23 Apr 2024
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असल्याचा त्यांच्या कुटुंबीयांना संशय आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला आहे का ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी पोलिसांना केली. तसेच, आतापर्यंत या प्रकरणी केलेल्या तपासाचा आणि जमा केलेल्या पुराव्यांचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 23 Apr 2024
पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली! बहिणीच्या संसारालाच सुरुंग…

नागपूर : मोठ्या बहिणीच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या मेहुणीचा जीव भाऊजीवर जडला. काही दिवसांत दोघांचे सूत जुळले त्यातून ती गर्भवती झाली. ती भाऊजीसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागली. मात्र, बाळ झाल्यानंतर प्रकार उघडकीस आला. दोन सख्ख्या बहिणींच्या संसाराचा वाद असल्यामुळे भरोसा सेलने समूपदेशन करून तिढा सोडवला.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 23 Apr 2024
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?

नागपूर : जिल्ह्यात सुरक्षित प्रसूतीसाठी रामटेक, पारशिवनी तालुक्यात ४ माहेरघरे उभारण्यात येणार होती. परंतु, अद्याप ही माहेरघरे उभारण्यात आली नसल्याने वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून आरोग्य विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 23 Apr 2024
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा

ठाणे : येथील कोलशेत भागातील २०.५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ला सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा झाला आहे. यानिमित्ताने सेंट्रल पार्कला भेटी देण्याचा नागरिकांचा ओढा कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सविस्तर वाचा…

11:28 (IST) 23 Apr 2024
ठाणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज, ४ हजार जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई, १५५ अवैध शस्त्र जप्त

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे शहर पोलिसांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर चार हजार प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. तसेच १५५ अवैध शस्त्र जप्त करण्यात आले असून यातील १७ अग्निशस्त्र आणि ४० काडतूसे आहेत.

सविस्तर वाचा…

11:26 (IST) 23 Apr 2024
“भाजपाने सुरतमध्ये चंदीगड पॅटर्न राबवून उमेदवार जिंकवला”, संजय राऊतांचा हल्लाबोल

गुजरातच्या सुरत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं आहे. काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी तसेच, पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचे उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आल्यानंतर अन्य ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यावर काँग्रेसने घणाघाती टीका केली असून पराभवाच्या भीतीने ‘मॅचफिक्सिंग’ करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनीदेखील टीका केली आहे. राऊत म्हणाले, ही बिनविरोध निवड नाही तर ही लूट आहे. भाजपाने चंदीगड पॅटर्न राबवून उमेदवार जिंकवला आहे. सुरतमध्ये जे काही झालं, ज्या प्रकारे त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द केला, तो रद्द करताना त्यांनी जी कारण दिली आहेत, तो सगळा प्रकार म्हणजे लोकशाहीची लूट आहे. असं या देशाच्या इतिहासात कधी घडलेलं नाही. लोकशाहीत असं घडलेलं मी पाहिलं नाही. भाजपाने सुरतमध्ये लोकशाहीचं वस्त्रवरण केलं आहे. म्हणूनच आम्हाला वाटतं की आपल्या देशातली हुकूमशाही संपायला हवी.

आमदार राजू पाटील (फोटो-संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणूक ही वाघाची डीएनए टेस्ट : मनसे आमदार राजू पाटील

देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडली असून आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान लवकरच होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारासाठी मनसेही प्रचाराच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाला थेट इशारा दिला आहे.

“ही लोकसभा निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. त्यामुळे कोण नकली, कोण असली हे लवकरच कळेल. मी याबाबत जास्त काही बोलत नाही. राजकारण करा, परंतु नेरिटीव्ह सेट करू नका. एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही. आम्ही वारंवार हे पाहत आहोत. एवढ्या राजकीय घटना घडल्या असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना एखादा फोन करून साधी विचारणाही केली नाही”, असे आमदार राजू पाटील म्हणाले.