मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्पाचं वाचन केलं. पहिल्याच अर्थसंकल्पात सरकारनं राज्याच्या सर्वांगिण विकासाचं उद्दिष्ट ठेवतं अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात पुण्याच्या विकासासाठी सरकारनं अनेक घोषणा केल्या आहेत.

राज्य सरकारनं शेतकऱ्यांसह वंचित घटकांच्या कल्याणासाठी वाढीव निधीची तरतूद करत अनेक योजनांची घोषणा केली आहे. अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पुण्याच्या विकासाकडं विशेष लक्ष दिलं असल्याचं अर्थसंकल्पाच्या भाषणातून दिसलं.

पुण्यासाठी अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा

अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, ‘पुणे शहरात वाहतूक कोडींचा प्रश्न आहे. औरंगाबाद, हैदराबाद, बंगळुरू यासारख्या मोठ्या शहरातून पुण्यात वाहनं येतात. या वाहनामुळे वाहतूक कोडींचा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी पुणे शहराच्या बाहेरून रिंग रोड करण्यात येईल. तसा प्रस्ताव सरकारसमोर असून, चार वर्षात हा रिंग रोड तयार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,’ अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

पुण्यात मेट्रोचा काम सुरू आहे. मागच्या सरकारच्या काळात देण्यात आलेल्या निधीपेक्षा जास्त निधी आगामी वर्षात देण्यात येईल. त्याचबरोबर पुणे मेट्रोचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे. स्वारगेट ते कात्रजर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

पुणे शहरात आणखी एका विमानतळाची भर पडणार आहे. सोलापूर आणि पुणे येथे नवीन विमानतळ उभारणार असल्याचं पवार म्हणाले.

आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असलेल्या बालेवाडीच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. अजित पवार यांनी बालेवाडीत आतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

पुणे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला राज्य सरकारकडून चारशे कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे.

पुण्यात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी एक हजार क्षमतेचं वसतिगृह राज्य सरकार उभारणार आहे.

Story img Loader