जलसंपदा आणि सिंचन विभागाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, राज्याच्या सहकार व पणन विभागासाठी १२८४ कोटी रुपये देण्यात येणार आहे. महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटी मंजूर करण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले, राज्यात जलसंपदा विभागाची २७८ कामं सुरू आहेत यातून २६,८८,५७६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यातून ८,४०० घनमीटर इतका पाणीसाठा निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत २६ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची उर्वरीत किंमत २१,६९८ कोटी २१ लाख इतकी आहे. सन २०२१-२२ या वर्षात २६ पैकी १३ प्रकल्प पूर्ण करायचे सरकारचे उद्दीष्ट आहे असे आश्वासन त्यांनी दिले.
बळीराजा जलसंजीवनी योजने अंतर्गत ९१ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत १५,३२५ कोटी ६५ लाख इतकी आहे. या पैकी १९ प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून १,०२,७६९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
जलसंपदा विभागाच्या पूर्णत्वावर असलेले इतर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी १ हजार कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ अखेर हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुर्नस्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत १२ धरणांच्या बळकटीकरणाकरीता ६२४ कोटी रूपये कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यातील सुमारे ५००० हेक्टर क्षेत्रात बंदनलिकांद्वारे सिंचनाचा लाभ देणार.