महाविकास आघाडी सरकारकडून आज (शुक्रवार)राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विकासाची पंचसूत्री मांडली. अर्थसंकल्प मांडल्यानंतर सभागृहाच्या बाहेर आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना यावर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे अर्थ खातं देखील आहे, त्यांनी आज राज्याचा आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, की मागील दोन वर्ष विविध आपत्तींना तोंड देत देत राज्याचा विकास सातत्याने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आजचा हा अर्थसंकल्प हा त्या दृष्टीने विकासाच्या दिशेने टाकलेलं एक पुढचं पाऊल आहे.”
तसेच, “जे काही करता येणं शक्य आहे ते आम्ही करत आलेलो आहोत आणि यापुढे देखील करणार आहोत. हे आजच्या अर्थसंकल्पातून सूचित होत आहे आणि ठाम पणाने सांगू इच्छितो की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांच्या साक्षीने जनतेसाठी आणि राज्यातील माता-भगिनींचा विकास करणारा आणि त्यांना आधार देणारा आहे. मला खात्री आहे जनता देखील त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही.” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी राखून ठेवला असल्याची घोषणा केली.