Maharashtra Budget 2024 : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली असून आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार आता पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार आहे.
काय म्हणाले अजित पवार?
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे. महिलांच्या आरोगांच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणे ही आपली जबाबदारी आहे. एलीपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असा पर्याय मानला जातो. त्यामुळे याचा वापर वापर वाढवला पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. गॅस सिलिंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी जाहीर करत आहे, असं अजित पवार म्हणाले.
ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी महिलांच्या विकासाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांचीही माहिती दिली. महाराष्ट्रात ६ लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून ती संख्या ७ लाख करण्यात येईल. तसेच त्यांच्यासाठीच्या निधीची रक्कम १५ हजाराहून ३० हजारांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, असे म्हणाले.
याशिवाय महिला लघुउद्योजिकांनी १५ लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे. महिला व बालकांविरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी १०० विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
© IE Online Media Services (P) Ltd