Maharashtra Budget 2025 Update: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आज विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दुपारी २ च्या सुमारास अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या किती आश्वासनांची यात पूर्तता होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करण्याच्या यादीत आज दुसऱ्या स्थानी आले आहेत. या यादीत त्यांनी त्यांचे पूर्वाश्रमीचे पक्षसहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मागे टाकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार ११व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प

महाराष्ट्रात आजपर्यंत ७८ वेळा अर्थसंकल्प सादर झाले असून त्यात विद्यमान अर्थमंत्री अजित पवार हे दुसऱ्या स्थानी आहेत. अजित पवारांनी आजपर्यंत त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात १० वेळा अर्थसंकल्प सादर केले असून आज त्यात ११ व्या अर्थसंकल्पाची भर पडणार आहे. जयंत पाटील यांनी १० अर्थसंकल्प सादर केले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ९ वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत. हे दोघे नेते अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत.

सर्वाधिक अर्थसंकल्प कुणी सादर केले?

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा इतिहास पाहता आजपर्यंत सादर झालेल्या एकूण ७८ अर्थसंकल्पांपैकी सर्वाधिक १३ अर्थसंकल्प हे माजी अर्थमंत्री दिवंगत बॅ. शेषराव वानखेडे यांनी सादर केले आहेत. शेषराव वानखेडे सर्वप्रथम १९५७ साली मुंबई प्रांत निवडणुकीत तर १९६२ साली संपूर्ण महाराष्ट्र निवडणुकीत कमवेश्वर मतदारसंघातून सर्वप्रथम निवडून आले होते.

कुणी किती वेळा अर्थसंकल्प सादर केला?

बॅ. शेषराव वानखेडे – १३

अजित पवार – १० (आज ११व्यांदा)

जयंत पाटील – १०

सुशीलकुमार शिंदे – ९

बॅ. रामराव आदिक – ७

सुधीर मुनगंटीवार – ६

मधुकरराव चौधरी – ५

यशवंतराव मोहिते – ४

एकनाथ खडसे – ३

स. गो. बर्वे – २

महादेव शिवणकर – २

दिलीप वळसे पाटील – २

शंकरराव चव्हाण – १

देवेंद्र फडणवीस – १

गोपीनाथ मुंडे – १

सुनील तटकरे – १

डॉ. व्ही. सुब्रह्मण्यम – १

लाडक्या बहि‍णींसाठी आज कोणती घोषणा?

दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार आज राज्यातील लाडक्या बहि‍णींसाठी कोणती घोषणा करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सत्ताधारी महायुतीनं विधानसभा निवडणुकीआधी लाडक्या बहि‍णींना मिळणारा निधी १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. यासंदर्भात अजित पवार आज घोषणा करणार का? याची उत्सुकता लाभार्थी महिलांमध्ये दिसत आहे. याशिवाय ग्रामीण भागांत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सौरऊर्जेचा वापर करणाऱ्यांना सवलती देण्याचे सूतोवाचही करण्यात आले आहे.