Deputy CM Ajit Pawar Budget 2025 Speech LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेश होत असून नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय असेल? याची उत्सुकता सगळीकडे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महायुतीनं निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पात होणार का? याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात व बाहेरदेखील अर्थसंकल्पावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा दिसून आला.
इथे पाहा भाषणासह अधिवेशन कामकाजाचा व्हिडीओ
Maharashtra Budget 2025 : अर्थमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचे सर्व अपडेट्स!
अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या तोंडाला पुसली पाने! मागितले होते ११,७२८ कोटी मिळाले अवघे ३८२७ कोटी…
आरोग्य विभागाला अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे हे प्रत्येक पक्ष मान्य करत असला तरी सत्तेवर आल्यानंतर प्रत्यक्षात अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला निधी वाटपात तोंडाला पाने पुसली जात असल्याचे मागील काही वर्षातील चित्र यंदाच्या अर्थसंकल्पातही कायमच राहिले.
राज्यात चारचाकी वाहने महागणार! इलेक्ट्रिक मोटारींवर आकारला जाणार ६ टक्के कर, अजित पवारांची घोषणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (१० मार्च रोजी) राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सांगितले की, २०४७ पर्यंत पंतप्रधानांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल. अर्थसंकल्पात मोठी घोषणा करताना, महाराष्ट्र सरकारने महागड्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ टक्के कर आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2025:
जाहिरनाम्यातल्या थापांपैकी एकतरी गोष्ट या अर्थसंकल्पात केली आहे का? लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले का? शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली का? मी नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात कार्यक्रम जाहीर करून कर्जमुक्ती जाहीर केली होती. ते आज झालेलं नाही. प्रत्येकाला अन्न व निवारा ही त्यांची घोषणा होती. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार होते. त्या कधी ठेवणार? एवढं बहुमत असूनही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहत नसतील तर तुमच्या या बहुमताला कोण विचारणार? – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2025: मला आज अत्रेंची आठवण झाली – उद्धव ठाकरे
मला आज आचार्य अत्रेंची आठवण आली. अत्रे असते तर म्हणाले असते की गेल्या १० हजार वर्षांत एवढा बोगस अर्थसंकल्प कुणी मांडला नव्हता. मी अर्थसंकल्प समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा सार सांगायचा झाला तर उद्या सूर्य उगवणार आहे, सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि त्यातून सगळ्यांना व्हिटॅमिन डीदेखील मिळणार आहे. निवडणुकीच्या काळात वारेमाप जाहिराती करण्यात आल्या होत्या – उद्धव ठाकरे
Devendra Fadnavis on Ladki Bahin Scheme: लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधीपासून मिळणार? मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
आपल्याला योजनेसाठी किती पैसे लागले हे वर्षभरानंतर समजतं. गेल्या वर्षीच्या अंदाजानुसार या योजनेसाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पुन्हा वाढवायची गरज पडली तर जुलै, डिसेंबर या वेळी वाढवता येईल. आवश्यक तेवढी तरतूद करण्यात आली आहे. हा निधी २१०० करण्याबाबत आमचं काम चालू आहे. पण त्याचवेळी अर्थसंकल्पाचं संतुलन कायम राखणंही महत्त्वाचं आहे आणि घोषणाही आपल्याला पूर्ण करायची आहे. जर आपल्याला शाश्वत पद्धतीने योजना कायम चालू ठेवायच्या असतील, तर आर्थिक शिस्तही महत्त्वाची आहे. त्यामुळे व्यवस्थित संतुलन करून आम्ही दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार आहोत. याचा अर्थ एप्रिल महिन्यात १५०० रुपयेच मिळणार. ज्यावेळी आम्ही २१०० रुपयांची घोषणा करू तेव्हापासून मिळणार – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi: लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी वाढणार? एकनाथ शिंदे म्हणाले…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीही ३६ हजार कोटींची तरतूद केली आहे. ते विचारतायत वाढणार कधी? त्यावर आमचं काम चालू आहे. आम्ही ज्या घोषणा केल्या त्या प्रिंटिंग मिस्टेक नाहीयेत. आम्ही त्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. जे काही आश्वासन दिलं ते पंचवार्षिक असतं. तुम्हाला त्याचं गणित तर केलं पाहिजे – एकनाथ शिंदे

Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi: अर्थसंकल्पावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया…
महायुतीच्या काळातला हा पहिला अर्थसंकल्प आहे. गेल्या वेळीही आम्ही तिघं होतो. खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे. पण थोडी अदलाबदल झाली असली तरी टीम तीच आहे. टीमवर्क म्हणून आम्ही गेल्या अडीच वर्षांत काम केलं, तेच आम्ही पुढे नेत आहोत. राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
नागरीकांना ऑनलाईन पद्धतीने मुद्रांक शुल्काचा भरणा करणे व प्रमाणपत्र देणे हे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम १० (३) व (४) मध्ये “ई-मुद्रांक प्रमाणपत्राची” नवीन तरतूद लागू करण्याचे प्रस्तावित आहे – अजित पवार
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 4 नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास, पुरक दस्तऐवजांना रुपये १०० ऐवजी रुपये ५००/- इतके मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे – अजित पवार
बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एस्कॅव्हेटर्स या प्रकारातील वाहनांना अनिवार्यपणे एकरकमी वाहनाच्या किंमतीच्या 7 टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे सन 2025-26 मध्ये राज्याला सुमारे १८० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे.
Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:
मोटार वाहन कराची कमाल मर्यादा ही २० लाख रूपयांवरून ३० लाख रूपये असे करण्याचे प्रस्तावित करीत आहे. कमाल मर्यादेत प्रस्तावित वाढीमुळे सन 2025-26 मध्ये राज्याला सुमारे १७० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे – अजित पवार

सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर चारचाकी सीएनजी व एलपीजी वाहनांवर वाहन प्रकार आणि किंमतीनुसार 7 ते 9 टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी केली जाते. या कराच्या दरांमध्ये १ टक्क्याने वाढ प्रस्तावित करीत आहे. राज्यात रूपये ३० लाखा पेक्षा अधिक किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6 टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे. सदर दरवाढीमुळे राज्यास सन 2025-26 मध्ये सुमारे १५० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे – अजित पवार
Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:
सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वत:च्या कर महसूलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट तीन लाख त्रेचाळीस हजार चाळीस कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले होते.
सन २०२4-२5 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःच्या कर महसूलाचा सुधारीत अंदाज रुपये तीन लाख सदुसष्ट हजार चारशे सदुसष्ट कोटी एवढे प्रस्तावित करण्यात आले आहे.
सन २०२5-२6 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसूलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट तीन लाख सत्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये एवढे प्रस्तावित करण्यात येत आहे.
Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:
सार्वजनिक बांधकाम इमारती विभाग – १३६७ कोटी
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला – ३१५९ कोटी
सामान्य प्रशासन विभागाला – २८९९ कोटी
मराठी भाषा विभागाला २२५ कोटी रुपये
Arthsankalp Adhiveshan 2025:
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं रक्षण व विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य व धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रातील कोकणातल्या संगमेश्वर इथे आहेत. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी लढ्यात संभाजी महाराजांनी बोटांवर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन इथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायम स्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी करतो. छत्रपती संभाजी महाराजांचं पवित्र बलिदान स्थळ असलेल्या पवित्र मौजे तुळापूर व समाधीस्थळ मौजे वडूबुद्रुक येथे त्यांच्या स्मारकाचं काम प्रगतिपथावर आहे. दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय शासनानं घेतला व त्याची अंमलबजावणीही केली – अजित पवार

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
नियोजन विभाग – ९०६० कोटी ४५ लाख
वित्त विभाग – २०८ कोटी
महसूल व वन विभागाला २९८१ कोटी
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
गृह विभाग – २२३७ कोटी
उत्पादन शुल्क विभाग – १५३ कोटी
विधी व न्याय विभाग – ७५९ कोटी
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय – ५४७ कोटी
Arthsankalp Adhiveshan 2025:
सन 2025-26 च्या अर्थसकंल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7 लाख 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सन 2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 5 लाख 60 हजार 964 कोटी रुपये व महसुली खर्च 6 लाख 6 हजार 855 कोटी रुपये अंदाजित केला आहे. परिणामी 45 हजार 891 कोटी रुपये अंदाजित तूट येत आहे – अजित पवार
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
गृहनिर्माण विभाग – १२४६ कोटी ५५ लाख
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला ३८७५ कोटी
सार्वजनिक आरोग्य विभागाला ३८२७ कोटी
उच्च व तंत्र शिक्षण विभागाला ३०९८ कोटी
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग – २५७४ कोटी
महिला व बाल विकास विभागाला ३१ हजार ९०७ कोटी
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला ३४९६ कोटी
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
बचत गटांच्या उत्पादनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारला जाईल – अजित पवार
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
राजकोषीय सुधारणांमध्ये राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे. राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरले आहे. तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या १ टक्क्यापेक्षा कमी राहिली आहे. सन 2025-26 ची राजकोषीय तूट 1 लाख 36 हजार 235 कोटी रुपये आहे – अजित पवार
Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi:
सन 2025-26 च्या अर्थसकंल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7 लाख 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सन 2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 5 लाख 60 हजार 964 कोटी रुपये व महसुली खर्च 6 लाख 6 हजार 855 कोटी रुपये अंदाजित केला आहे. परिणामी 45 हजार 891 कोटी रुपये अंदाजित तूट येत आहे – अजित पवार
Arthsankalp Adhiveshan 2025:
सन 2025-26 मध्ये कार्यक्रम खर्चाची रक्कम 2 लाख 54 हजार 560 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 22 हजार 658 कोटी रुपये, तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 21 हजार 495 कोटी रुपये नियतव्ययाचा समावेश आहे – अजित पवार
सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक येाजनेअंतर्गत 20 हजार 165 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तरतूद 2 हजार कोटी रुपयांनी अधिक आहे – अजित पवार
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
सन 2024-25 च्या अंदाजपत्रकात 4 लाख 99 हजार 463 कोटी रुपये महसूली जमा अपेक्षित होती. महसूली जमेचे सुधारित अंदाज 5 लाख 36 हजार 463 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत. सन 2024-25 च्या एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपये व सुधारित अंदाज 6 लाख 72 हजार 30 कोटी रुपये असून, भांडवली व कल्याणकारी योजनांवरील खर्चात झालेल्या वाढीमुळे सन 2024-25 या वर्षाच्या एकूण खर्चाच्या सुधारित अंदाजात वाढ झाली आहे – अजित पवार

Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण व परीक्षाशुल्क १०० टक्के सरकारकडून दिलं जाईल. मान्यताप्राप्त उच्च व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रक्रियेतून प्रवेश घेणाऱ्या व ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना हा लाभ दिला जातो – अजित पवार
Deputy CM Ajit Pawar Budget Speech:
लेक लाडकी योजनेंतर्गत १ लाख १३ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला आहे. पुढील वर्षासाठी या योजनेकरता ५० कोटी ५५ लाखांचा खर्च प्रस्तावित आहे – अजित पवार

Arthsankalp Adhiveshan 2025:
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य – २५५८१ कोटी
आदिवासी विकास – २१४९५ कोटी
इतर मागास व बहुजन कल्याण – ४३६८ कोटी
दिव्यांग कल्याण – १५२६ कोटी
अल्पसंख्याक विकास विभागाला – ८१२ कोटी
आर्थिक सर्वेक्षण २०२५ | महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ (प्रातिनिधिक छायाचित्र)
Maharashtra Budget 2025 LIVE Updates, 10 March 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५