Maharashtra Budget 2025 Ajit Pawar : मुंबई, नागपूर व पुणे या तीन शहरांमध्ये राज्य सरकाकडून अनेक मेट्रो मार्गिकांचं काम चालू आहे. तर, या तिन्ही शहरांत मेट्रोच्या काही मार्गिका चालू आहेत. येत्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी सरकार काही नव्या मेट्रो मार्गिकांचं बांधकाम सुरू करणार आहे. अनेक मेट्रो मार्गिका प्रस्तावित असून त्यापैकी काही मार्गिकांना मंजुरी देखील मिळाली आहे. या मार्गिकांच्या कामांना आता सुरुवात होणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (१० मार्च) जाहीर केलं. अजित पवार यांनी काही वेळापूर्वी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर या नव्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून याद्वारे सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
अजित पवार म्हणाले, “मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकुलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १४३.५७ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सेवेचा लाभ सुमारे १० लाख प्रवासी रोज घेत आहेत. येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किलोमीटर, तर पुण्यामध्ये २३.२ किलोमीटर असे एकूण ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. येत्या ५ वर्षांत एकूण २३७.५ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत.”
अर्थमंत्री म्हणाले, “नागपूर मेट्रोचा ४० किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात ६ हजार ७०८ कोटी रुपये किंमतीचे ४३.८० किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे शहरात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. पुणे मेट्रो रेल्वेच्या टप्पा-२ अंतर्गत खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग या दोन मार्गिकांचा ९ हजार ८९७ कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेlतलं जाणार आहे.”
एप्रिल २०२५ पासून नवी मुंबई विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार
यासह नवी मुंबईतील उलवे येथे १ हजार १६० हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि २.६ दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरीत्या पार पडली आहेत. येथून एप्रिल, २०२५ मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.