Maharashtra Budget Session 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या आधी अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहाता यंदाचं अधिवेशन वादळी ठरणार याची चिन्ह दिसू लागली होती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्याचा प्रत्यय आला. नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर भाजपानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मागणीवरून भाजपा आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, अशा वातावरणात देखील भाजपा आमदारांनी दिलेली एक घोषणा गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांचा गोंधळ उडवून गेली!
नेमकं झालं काय?
शोक प्रस्तावानंतर अधिवेशनाचं आजचं कामकाज स्थगित करण्यात आल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष लावून धरणार असल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलण्यापूर्वीच काही भाजपा आमदार त्यांच्या पाठिमागे उभे राहून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. तेव्हाच नेमका हा प्रकार घडला!
देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलण्यासाठी उभे राहिले असताना त्यांच्या उजवीकडे चंद्रकांत पाटील आणि डावीकडे गिरीश महाजन उभे होते. तसेचस मागच्या बाजूला भाजपाचे काही आमदार देखील उभे होते. यावेळी भाजपा आमदार जोरजोरात घोषणाबाजी देत होते. “ठाकरे सरकार हाय हाय, दाऊद सरकार हाय हाय”, अशा घोषणा देण्यात येत होत्या.
…आणि गिरीश महाजनांनी वेळ मारून नेली!
या घोषणांच्या पाठोपाठ अचानक भाजपा आमदार “नवाब मलिक सरकार हाय हाय”, अशा घोषणा देऊ लागले. पहिल्या घोषणेला त्यांच्या पाठोपाठ ‘हाय हाय’ म्हणणाऱ्या गिरीश महाजनांना पुढच्याच क्षणी चूक लक्षात आली. तोपर्यंत फडणवीसांच्या बाजूला उभ्या असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी देखील ही घोषणा होऊ शकत नाही, असं बोलून टाकलं. हे नवाब मलिक सरकार नसून ठाकरे सरकार आहे, त्यामुळे अशी घोषणा होऊ शकत नाही, हे लक्षात येताच गिरीश महाजनांनी मागे वळून क्षणार्धात हीच घोषणा ‘मॉडिफाईड’ करून टाकली!
भाजपा आमदारांची घोषणा बदलून गिरीश महाजनांनी स्वत:च “नाही रे, नाही रे” म्हणत पुढची घोषणा दिली “जवाब दो, जवाब दो, उद्धव ठाकरे जवाब दो”! यानंतर घोषणाबाजी थांबली आणि देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना रीतसर प्रतिक्रिया दिली.
अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे होत असले, तरी या सगळ्या गोंधळ आणि कोलाहलात असे काही किस्से मात्र चर्चेचा विषय ठरतात!