आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी जवळपास सर्वच आमदारांनी अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यादेखील आपल्या लहान बाळाला घेऊन विधिमंडळात दाखल झाल्या होत्या. मात्र, बाळाला ठेवण्यासाठी हिरकणी कक्षात सोयी-सुविधा नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांना अश्रूही अनावर झाले होते. दरम्यान, हिरकणी कक्षाच्या या दुरावस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – विधिमंडळातील ‘हिरकणी कक्षा’ची दुरावस्था, आजारी बाळ अन् डोळ्यात अश्रू, सरोज अहिरेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाल्या…

काय म्हणाले अमोल मिटकरी?

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे तसेच आमदार नमिता मुंदडा यांना लहान बाळ आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी हिरकणी कक्ष स्थापन करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. मात्र, त्या हिरकणी कक्षात एक पाळणादेखील नाही. या कक्षाची अवस्था वाईट आहे. त्यामुळे लहान बाळांच्या जिवाला काही बरं वाईट झालं, तर याची जबाबदारी हे सरकार घेईल का? या सरकारला लाज, लज्जा, शरम काही शिल्लक आहे की नाही? अशी नमक हरामी तुम्ही महाराष्ट्राबरोबर किती दिवस करणार आहात?” अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

“राज्यातील सरकार कसाबी प्रवृत्तीचं”

“राज्यातील एक महिला प्रतिनिधी रडून आपल्या बाळासाठी हिकरणी कक्षात सोय नाही, हे सांगत असेल तर हे सरकार किती निर्दयी आहे, हे लक्षात येईल. एकीकडे हे सरकार शिवरायांचं नाव घेत असेल आणि दुसरीकडे या सरकारला आपल्या लोकप्रतिनिधींची काळजी नसेल, तर हे सरकार कसाबी प्रवृत्तीचं आहे. या सरकारचा मी धिक्कार करतो”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra budget session 2023 amol mitkari criticized shinde bjp government on hirkani room issue spb