Mumbai News Updates, 13 March 2023 : राज्यात विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिलाच अर्थसंकल्प मांडत अनेक घोषणा केल्या. त्यानंतर आता अधिवेशनात या अर्थसंकल्पावर चर्चा होईल. विरोधकांकडून घोषणा केल्या, मात्र निधी कुठं आहे असा सवाल करण्यात आला. त्यामुळे आता याचे पडसाद सभागृहातील चर्चेतही उमटणार आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांचा वापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी होत असल्याचाही आरोप विरोधकांकडून होत आहे. यावरुनही अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. एकूणच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा हा आढावा…

Live Updates

Marathi News Updates : राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासह इतर सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

20:11 (IST) 13 Mar 2023
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरण : मग तो व्हिडीओ डिलीट का केला? ठाकरे गटाच्या नेत्याचा सवाल

शीतल म्हात्रे म्हणतात माझ्या व्हिडीओशी छेडछाड केली, मॉर्फिंग केलं. त्याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली. आमचा साईनाथ दुर्गे नावाचा कार्यकर्ता दोन दिवस बंगळुरूमध्ये बहिणीकडे गेला होता. त्याला विमानतळावरून अटक केली. हे काय आहे? म्हात्रेंचं म्हणणं इतकंच आहे की, त्या व्हिडीओशी छेडछाड झाली आहे. असं असेल तर पोलिसांनी तपासावं. राजू सुर्वेंच्या फेसबुकवरून त्या मिरवणुकीचं लाईव्ह प्रक्षेपण केलं होतं. लाईव्हमध्ये तोच व्हिडीओ होता. मग तो व्हिडीओ डिलीट का केला? आम्ही दहिसर पोलीस स्टेशनला शीतल म्हात्रेंविरोधात तक्रार दिली आहे.

- विनोद घोसाळकर (ठाकरे गटाचे नेते)

19:15 (IST) 13 Mar 2023
"भूषण देसाईंनी मला सांगितलं की, तुमच्यासोबत...", एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

ही सगळी कामं, बाळासाहेबांची भूमिका याचा विचार करून भूषण देसाईंनी मला सांगितलं की, तुमच्यासोबत काम करायचं आहे. त्यांनी काम करणाऱ्या लोकांबरोबर राहायचं असा निर्णय घेतला. विकासाभिमूख निर्णय घेणारं सरकार असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.

- एकनाथ शिंदे

19:14 (IST) 13 Mar 2023
बाळासाहेबांबरोबर काम करणाऱ्या नेत्यांचाही आम्हाला पाठिंबा - एकनाथ शिंदे

बाळासाहेबांबरोबर काम करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनीही पाठिंबा दिला, सोबत आले. रामदास कदम, अडसुळ, प्रतापराव जाधव व इतर मान्यवर ज्यांनी बाळासाहेबांबरोबर काम केलं ते सोबत आले. ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे.

- एकनाथ शिंदे

19:13 (IST) 13 Mar 2023
आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा ५० आमदार आणि १३ खासदार सोबत आले - एकनाथ शिंदे

आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा ५० आमदार आणि १३ खासदार सोबत आले. तसेच हजारो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व इतर लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर काम करू लागले. सरकार स्थापन झाल्यानंतर हजारो कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी आम्हाला पाठिंबा दिला.

- एकनाथ शिंदे

19:05 (IST) 13 Mar 2023
सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "त्यांनी..."

विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि इकडे आपला हा कार्यक्रम सुरू आहे. भूषण देसाई यांचं मी शिवसेनेत स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार या राज्यात स्थापन झालं. त्यांची भूमिका आणि विचार आम्ही पुढे नेण्याचं काम करत आहोत. त्यामुळे या महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यातून तालुका-तालुक्यातून कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत.

- एकनाथ शिंदे

18:27 (IST) 13 Mar 2023
सुभाष देसाईंचा मुलगा शिंदे गटात प्रवेश करणार; आदित्य ठाकरे म्हणाले, "त्यांच्यासारखी..."

सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांचा शिवसेनेशी काही संबंध होता असं मला वाटत नाही. कुणाला वॉशिंग मशिनमध्ये उडी मारायची असेल, तर ते कुठेही जाऊ शकतात. सुभाष देसाई दररोज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असतात. ते आजही शिवसेनेसाठी काम करत आहेत. त्यांनी कालही सांगितलं की, पद नसलं, मंत्रीपद नसलं, आमदारकी-खासदारकी नसली तरी त्यांनी पक्ष कार्यासाठी दिवसातील २४ तास दिले आहेत. त्यांच्यासारखी निष्ठा घेऊनच आम्ही काम करत असतो.

- आदित्य ठाकरे

18:23 (IST) 13 Mar 2023
ठाकरे गटाला धक्का, सुभाष देसाईंचा मुलगा शिंदे गटात प्रवेश करणार

ठाकरे गटाला धक्का, सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई शिंदे गटात प्रवेश करणार

18:10 (IST) 13 Mar 2023
मुंबई : मालाड पूर्वमध्ये झोपडपट्टीत भीषण आग

मुंबई : जोगेश्वरी पश्चिमेकडे लाकडाच्या दुकानांना लागलेली आग विझलेली नसताना दुपारी मालाडमध्ये एका झोपडपट्टीत आग लागली. काही मिनिटांतच ही आग भडकली व अग्निशमन दलाने तिसऱ्या क्रमांकाची वर्दी दिली.

सविस्तर वाचा...

17:52 (IST) 13 Mar 2023
शीतल म्हात्रेंच्या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एसआयटीची घोषणा

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एसआयटीची घोषणा, शंभुराजे देसाई यांची माहिती, वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत होणार, शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर निर्णय, व्हिडीओशी छेडछाड केल्याचाही तपास होणार, आतापर्यंत ५ जणांना अटक

17:28 (IST) 13 Mar 2023
नाशिक : लाल वादळाची मुंबईच्या दिशेने आगेकूच; माकप, किसान सभेसह समविचारी संघटनांचा मोर्चा

नाशिक – शेतमालाला अत्यल्प भाव, वनजमिनींचा प्रश्न, गॅस दरवाढ यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या वतीने मुंबईत विधान भवनावर धडक देण्यासाठी रविवारी दिंडोरी येथून निघालेला मोर्चा सोमवारी शहरात पोहोचला.

सविस्तर वाचा..

16:42 (IST) 13 Mar 2023
अजित पवारांनी ४० आमदारांसाठी निधीची उधळण केल्याचा आरोप करत आकडेवारीच वाचली, म्हणाले...

तुम्ही म्हणाल निधीची उधळण कशी होते. मी १ डिसेंबर २०२२ चा एक जीआर बघितला. नगरविकास विभागाने जीआर काढला की, ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी १९५ कोटी रुपयांची मंजुरी दिली. मीरा-भाईंदर २५५ कोटी रुपयांची मंजुरी दिली. ठाण्यासाठीच्या या निधीपैकी संगीत कारंजे आणि सुशोभीकरण याला ५० कोटी, स्मशानभूमीत विद्युतदाहिनी आणि सुशोभीकरणाला ५० कोटी, विहिरींची साफसफाई ५० कोटी, डोंगराळ भागात सोलर दिवे बसवणे ५० कोटी रुपये, बस स्टॉप आणि ज्येष्ठ नागरिकांना कट्टा ५० कोटी, विद्यार्थ्यांसाठी उद्यानात अभ्यासिका २५ कोटी रुपये, चौकांचं सुशोभीकरण २० कोटी, सिग्नल यंत्रणा १० कोटी फुटपाथवर शोभिवंत रेलिंगसाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

- अजित पवार

16:24 (IST) 13 Mar 2023
"...म्हणून भाजपाचे १०५ आमदार नाराज आहेत", अजित पवारांचा मोठा दावा

४० आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण सुरू आहे. २८८ आमदारांपैकी केवळ ४० आमदारांचंच सरकार आहे की काय अशाप्रकारची शंका येते. यामुळे भाजपाचेही १०५ आमदार नाराज झाले आहेत. ते बोलत नाहीत, मात्र मागून खूप धुसफूस सुरू आहे. त्यांना फार त्रास होत आहे. हे त्यांना सांगतात की, थांबा, दम काढा, विरोधी पक्षात बसण्यापेक्षा त्यांच्या नेतृत्वात आपलं काहीतरी बरं चाललं आहे. असं असलं तरी चांगलं चालावं म्हणून त्यांना २०२४ पर्यंत थांबा म्हणून सांगत आहेत. मार्गदर्शन तर असं सुरू आहे की, या नाराज आमदारांना काही बोलूच दिलं जात नाही.

- अजित पवार

15:23 (IST) 13 Mar 2023
योग, क्रीडा महोत्सवातूनही भाजपची बांधणी

छत्रपती संभाजीनगर : एका बाजूला हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी गावाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला जात असून दुसरीकडे लाभार्थींना मतदार करण्याच्या प्रक्रियेला राज्यात वेग देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर महिलाकेंद्रित योजनांवर लक्ष केंद्रित करत भाजपकडून आता त्यात योग आणि क्रीडा महोत्सवाची भर टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

14:50 (IST) 13 Mar 2023
"धनगर समाजाला २५ हजार घरं देणार", देवेंद्र फडणवीसांची घोषणा

आपण वेगवेगळ्या घरांच्या योजना तयार करतो. मात्र, त्याचा धनगर समाजाला पाहिजे तसा फायदा मिळत नाही. त्यामुळे हे स्पष्टपणे ठरवलं की, यातील २५ हजार घरं धनगर समाजाला मिळाली पाहिजेत. ही संख्या किमान आहे, कमाल नाही. त्यामुळे यापेक्षा अधिक घरंही मिळाली तर अधिक चांगलं आहे.

- देवेंद्र फडणवीस

14:10 (IST) 13 Mar 2023
‘पैसे दे नाहीतर बायकोला विक’; देसाईगंजमधील सावकाराच्या ऑडियो क्लिपने खळबळ

गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज शहरात सध्या एका सावकाराच्या ऑडियो क्लिपची चर्चा आहे. यात तो सावकार दारू पिऊन कर्जदाराला ‘पैसे नसेल देत तर तुझ्या बायकोला मला विक, अशी मागणी करीत अश्लील भाषेत बोलत आहे. दोघांत मोबाईलवर झालेले हे संभाषण समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

सविस्तर वाचा...

14:10 (IST) 13 Mar 2023
राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानांवरून संसदेत भाजपकडून काँग्रेसची कोंडी

संसदेच्या अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात राहुल गांधींविरोधातील भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे वादळी ठरली. अदानी समूहाच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी करण्याची रणनिती आखली होती. मात्र, राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानांवरून संसदेमध्ये सोमवारी सकाळच्या सत्रामध्ये भाजपने काँग्रेसवर डाव उलटवल्याचे पाहायला मिळाले.

सविस्तर वाचा...

14:09 (IST) 13 Mar 2023
ईडीच्या कारवाईनंतर हसनमुश्रीफ कागलमध्ये दाखल; ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मागितली महिन्याची मुदत

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ हे ईडीने शनिवारी केलेल्या कारवाईनंतर आज सोमवारी कागल येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. ईडीची कारवाई सुरू झाल्यामुळे त्यांनी गावाकडे येण्याचे टाळले होते. ते गेले दोन दिवस नॉट रिचेबल होते.

सविस्तर वाचा...

13:17 (IST) 13 Mar 2023
उल्हासनगर पालिकेचा ४०० कोटींचा दंड माफ; एमआयडीसीचा पाणीपट्टीवरील दंड माफ करण्याचा निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेला अतिरिक्त पाणीपुरवठा करत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अतिरिक्त पाण्यासाठी अधिकचा दर आकारून अधिक बिल घेतले जात होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत उल्हासनगर महापालिकेचे पाण्याचे बिल मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तसेच विलंब शुल्क होत असल्याने ती थकबाकी ४०० कोटींच्या घरात पोहोचली होती. त्यामुळे हे विलंब शुल्क आणि दंड माफ करण्याची मागणी उल्हासनगर महापालिकेने केली होती.

सविस्तर वाचा..

12:58 (IST) 13 Mar 2023
देशातील वीज हानीचे प्रमाण १२ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य; अवैध जोडण्या, वीज चोरीचा फटका

नागपूर : बेकायदेशीर जोडण्या आणि चोरी यामुळे वीज वितरण कंपन्यांना आर्थिक फटका बसतो. तसेच या कंपन्यांच्या एकूण कामगारीवरही एकूण तांत्रिक आणि वाणिज्यिक (एटी ॲण्ड सी) क्षेत्रातील हानी हे घटक परिणामकारक ठरतात. त्यामुळे केंद्र सरकारने वितरण क्षेत्र योजनेच्या (आरडीएसएस) माध्यमातून २०२४-२५ पर्यंत संपूर्ण भारतात वीज हानीत १२ ते १५ टक्के घट करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. २०२१-२२ मध्ये १६.६८ टक्के होते.

सविस्तर वाचा...

12:58 (IST) 13 Mar 2023
शीतल म्हात्रेंच्या व्हायरल आक्षेपार्ह व्हिडीओवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, "त्यामागे..."

राजकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वतःचं चारित्र्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण लोक आमच्याकडे 'पब्लिक फिगर' म्हणून पाहत असतात. त्यामुळे राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायचं नाही. मात्र, कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की, याची चौकशी झाली पाहिजे. 'दूध का दूध, पाणी का पाणी' झालं पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहिजे.

- अजित पवार

12:35 (IST) 13 Mar 2023
“भीमा साखर कारखान्याच्या घोटाळ्याची कागदपत्रे सोमय्यांकडे चार वेळा पाठवली, ते म्हणाले…”; संजय राऊतांचे गंभीर आरोप

खासदार संजय राऊत यांनी दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित निःपक्ष चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या आरोपांनंतर त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषदे घेत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना लक्ष्य केलं. या घोटाळ्याची कागदपत्रे सोमय्यांकडे चार वेळा पाठवण्यात आली होती. मात्र, त्यांनी या घोटाळ्याची तक्रार करण्यास नकार दिला, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सविस्तर वाचा

12:33 (IST) 13 Mar 2023
“राहुल कुल यांचं प्रकरण देवेंद्र फडणवीसांसाठी अग्नीपरीक्षा”; संजय राऊतांचं सूचक विधान!

भाजपा आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित निःपक्ष चौकशीची मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण देवेंद्र फडणवीसांसाठी अग्नीपरीक्षा असल्याचं सूचक विधानही त्यांनी केलं. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

12:32 (IST) 13 Mar 2023
“दौंडमधील भीमा साखर कारखान्यात ५०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार”, राऊतांच्या आरोपांवर राहुल कुल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

भाजपाचे आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित निःपक्ष चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, राऊतांच्या या आरोपांवर आमदार राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली असून हे सर्व आरोप राजकीय असल्याचं ते म्हणाले. विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

12:31 (IST) 13 Mar 2023
शेतकऱ्यांना दिलासा! कांद्याला प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा; विधानसभेत बोलताना म्हणाले…

गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. सविस्तर वाचा

12:15 (IST) 13 Mar 2023
कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलचा स्वयंचलित दरवाजा उघडत नसल्याने प्रवाशांची तारांबळ

कल्याण – कल्याण-सीएसएमटी या सकाळी मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या अतिजलद वातानुकूलित लोकलच्या दरवाजाचा एक भाग स्वयंचलित पद्धतीने मागील १० दिवसांपासून उघडत नसल्याने प्रवाशांची लोकलमध्ये चढताना तारांबळ उडत आहे.

सविस्तर वाचा...

12:12 (IST) 13 Mar 2023
"उद्या व्हिडीओ मॉर्फ होण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते, कारण...", आमदार यामिनी जाधवांचा अधिवेशनात इशारा

एका आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ही अतिशय निंदनीय बाब आहे. हा व्हिडीओ पहिल्यांदा कुणी मॉर्फ केला त्याला शोधून काढावं. आज हा प्रकार आज एका आमदार आणि पहिलेबरोबर झाला, उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. कारण कुठलाही माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतो ते आम्ही व्हिडीओत बघितलं. त्या उद्घाटनाला मीही उपस्थित होते. महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते.

- आमदार यामिनी जाधव

12:01 (IST) 13 Mar 2023
“आज देवेंद्र फडणवीसांवर अशी वेळ आलीये की…”, आदित्य ठाकरेंची खोचक टीका

आदित्य ठाकरे म्हणतात, “अब्दुल गद्दार.. नाही सत्तार.. हे त्यांच्या भागात गद्दार म्हणूनच ओळखले जातात. ते जेव्हापासून मंत्री झालेत, तेव्हापासून…!”

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा...

11:34 (IST) 13 Mar 2023
चंद्रपूरच्या जंगलात आढळला औषधीयुक्त गुणांचा अतिशय दुर्मिळ पिवळा पळस

चंद्रपूर : वैविध्याने समृद्ध जिल्ह्यातील जंगलात अतिशय दुर्मिळ पिवळा पळस मिळाला आहे. हा पळस अनेक अर्थांनी गुणकारी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा..

11:32 (IST) 13 Mar 2023
जुनी निवृत्तीवेतन योजना : ठाणे जिल्ह्यातून २० हजार कर्मचारी संपावर

ठाणे : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्तवेतन (पेन्शन) योजनेच्या मागणीसाठी उद्यापासून संप पुकारला आहे. या संपात ठाणे जिल्ह्यातून सुमारे २० हजार कर्मचारी संपावर जाणार असल्याचे ठाणे जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यातील नागरिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

11:27 (IST) 13 Mar 2023
"शीतल म्हात्रेंचं आयुष्य बरबाद होईल", मॉर्फ व्हिडीओप्रकरणी आमदार मनिषा चौधरींचं वक्तव्य

शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओची सखोल चौकशी करावी. नगरसेविका राहिलेल्या प्रतिष्ठीत महिलेबाबत रॅलीतील व्हिडीओची मॉर्फींग झाली आहे. एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही असं कितीवेळा स्वतःला सिद्ध करायचं. यावर कधी कारवाई होणार? या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल. ती विवाहीत महिला आहे. ज्याने हे केलं त्यावर कारवाईचे आदेश द्यावेत.

- मनिषा चौधरी

Maharashtra Live GIF

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Story img Loader