E-Bike Taxi Gets Approval: महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परिवहन विभागाकडून हा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रात फक्त ई-बाईक टॅक्सीलाच परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना सागितलं आहे.
ई-बाईक टॅक्सीबाबत नेमका काय निर्णय?
प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात लवकरच राबवल्या जाणाऱ्या ई-बाईक टॅक्सी उपक्रमाबाबत माहिती दिली. “परिवहन विभागाच्या माध्यमातून ई-बाईक टॅक्सीचा प्रस्ताव मंत्रिमडळाच्या मान्यतेसाठी ठेवला होता. सर्व मंत्र्यांनी महाराष्ट्रात बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे. आत्तापर्यंत एकट्या प्रवाशांची गैरसोय होत होती. रिक्षा-टॅक्सीसाठी एका प्रवाशालाही तिप्पट भाडं द्यावं लागत होतं. आता ई-बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांची ही गैरसोय दूर होणार आहे”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
“पूर्ण महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासाठी १५ किमी अंतराची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ५० बाईक एकत्रपणे घेणाऱ्या संस्थेला अशा प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली जाईल. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही चांगली नियमावली बनवली आहे. दोन प्रवाशांमधील पार्टिशन, पावसाळ्यात प्रवासी भिजू नये यासाठी पूर्ण कव्हर असणाऱ्याच ई-बाईकला आम्ही परवानगी देणार आहोत. ई बाईकला प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण राज्य सरकारने ठरवलं आहे”, असंही सरनाईक यांनी नमूद केलं.
प्रवासी भाडं किती असणार?
दरम्यान, या ई-बाईक टॅक्सीसाठी प्रवासी भाड्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचं सरनाईक म्हणाले. “यातल्या प्रवासी भाड्याच्या बाबतीत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्याबाबतच्या निर्णयासंदर्भात आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत आलो आहोत. आज धोरणाला मंजुरी मिळाली आहे. कमीत कमी दरांमध्ये प्रवाशांना रोजगार कसा देता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असं ते म्हणाले.
“प्रवासी भाड्यासंदर्भातली नियमावली सरकार तयार करणार आहे. रिक्षात ज्या प्रवासासाठी १०० रुपये लागतात, तो प्रवास ई-बाईक टॅक्सीमध्ये ३० ते ४० रुपयांत कसा होईल त्याबाबत आम्ही नियोजन करत आहोत. येत्या एक ते दोन महिन्यांत ई-टॅक्सी बाईक सुरू होतील”, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
“रिक्षा महामंडळाच्या सदस्य चालकांना १० हजारांचं अनुदान देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रिक्षावाल्याच्या मुलाने किंवा मुलीने ई-बाईक टॅक्सी घेतली तर त्याला १० हजार रुपयांचं अनुदान सरकार देईल, उर्वरीत रक्कम त्यांनी कर्ज रुपाने घ्यावी. जेणेकरून त्या मुलाच्या किंवा मुलीच्या खिशात एक रुपयाही नसताना त्याला ई-बाईक टॅक्सी घेता येईल”, असंही ते म्हणाले.
“फक्त मुंबई महानगर क्षेत्रात १० हजारांहून जास्त रोजगार निर्माण होईल. महाराष्ट्रभरात २० हजार रोजगार निर्माण होईल”, असा दावा सरनाईक यांनी केला.