State Election Commissioner’s Candidate : मुंबईत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य निवडणूक आयुक्त पदाच्या उमेदवाराची शिफारस करण्याचे सर्वाधिकार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यापूर्वी, राज्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाला राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांकडे नावाची शिफारस करण्याचे अधिकार होते, त्यानंतर मुख्यमंत्री ते नाव राज्यपालांकडे पाठवायचे. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता मुख्यमंत्री राज्यपालांना थेट उमेदवाराची शिफरस करतील.

राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहेत. तसेच येत्या काही महिन्यांत या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात येतात.

स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचे लक्ष

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या महायुतीने आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पावसाळ्यापूर्वी या निवडणुका घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी या निवडणुका घेण्याची जबाबदारी असलेल्या राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाच्या शिफारशीबाबत आजची मंत्रिमंडळाची बैठक बोलविण्यात आली होती.

राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान सप्टेंबरमध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त असून, नव्या आयुक्तांची निवड गेल्या काही महिन्यांपासून रखडली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य निवडणूक आयुक्तपदाच्या निवडीची प्रक्रिया सरकारने राबविली. दरम्यान, आयुक्तपदासाठी माजी मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे(बीपीटी) माजी अध्यक्ष राजीव जलोटा, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह डझनभर सनदी अधिकारी इच्छुक आहेत.

सरकारी होमिओपॅथी महाविद्यालयाची जागा बदलली

आज मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांपैकी दुसरा निर्णय कागल तालुक्यातील सरकारी होमिओपॅथी महाविद्यालयाबाबतचा आहे. मंत्रिमंडळाने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सांगाव येथे होणारे सरकारी होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालय पिंपळगाव खुर्द येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर यासाठी जमीन हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान ऑक्टोबर २०२४ मध्ये गेल्या सरकारच्या कार्यकाळात कागल तालुक्यातील सांगाव येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे सरकारी होमिओपॅथी महाविद्यालय आणि ५० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याच्या जागेत आता बदल करण्यात आला आहे.

Story img Loader