Cabinet Expansion : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१५ डिसेंबर) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला. आज नागपूरमध्ये मंत्र्‍यांचा शपथविधी पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळात अनेक माजी मंत्र्यांना आणि दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं आहे. त्यामुळे महायुतीतील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच शिवसेना शिंदे गटातील काही इच्छुक आमदारांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये भंडाऱ्याचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आमदार प्रकाश सुर्वे यांनीही आपली खदखद बोलून दाखवली आहे.

आमदार नरेंद्र भोंडेकर काय म्हणाले?

“आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपण पाहिलं तर अशा लोकांना संधी मिळाली ज्या लोकांचं पक्षात काहीच योगदान नाही. मंत्रि‍पदासाठी काही पदाची गरज नाही हे देखील लोकांना दिसलं. ज्यांच्यावर आक्षेप आहेत अशाही लोकांना मंत्रिपद मिळाले. काहींवर भ्रष्ट्राचाराचे आरोप आहेत. मात्र, असं असताना आम्हाला अपेक्षा होती. पण आम्हाला मिळालं नाही, याचं दु:ख वाटतंय. कार्यकर्तेही नाराज झाले आहेत. त्यामुळे मी म्हटलं की मी विदर्भ संपर्कप्रमुख आणि उपनेता असून देखील न्याय देऊ शकत नसेल तर कशाला या पदावर राहू? मग मी राजीनामा दिला”, असं म्हणत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

हेही वाचा : Devendra Fadnavis : ‘मविआ’ला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “सरकारची भूमिका…”

आमदार प्रकाश सुर्वे काय म्हणाले?

“आज महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. हे सरकार चांगलं काम करेल अशी मला खात्री आहे. मी नाराज असल्याचा प्रश्न नाही. पण मला जे काही आतापर्यंत मिळालं ते संघर्षातून मिळालं. मी आणि माझ्या आईने भाजी विकण्याचं काम केलं. मी कॉलेज करून भाजीचा व्यवसाय करायचो. म्हणजे कष्ट आणि संघर्ष हा माझ्या पाचवीलाच पुंजलेला आहे असं मला वाटतं. आता जे मंत्रिमंडळ बनलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कदाचित माझा विचार केलाही असेल पण काही आजी-माजी मंत्री आहेत. काही मातब्बर नेत्यांची मुलं आहेत. काही मोठ्या घरची लोक आहेत. पण मी एका गरीब घरचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला संघर्ष करणं भाग आहे. हे आता यावरून सिद्ध झालं. आता पुढचं पाऊल हे एकनाथ शिंदे जे ठरवतील ते असेल. मी संघर्ष करत राहणार”, असं आमदार प्रकाश सुर्वे यांनी म्हटलं. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

Story img Loader