Maharashtra Cabinet Expansion : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष हे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागलं आहे. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन जवळपास एक आठवडा होत आला. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. पण भारतीय जनता पक्ष गृहखात शिवसेनेला देण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याची कुजबूज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यातच आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे? याचं कारण देखील सांगितलं आहे. तसेच ‘आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही’, असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम असल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

“मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात आम्ही सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. तसेच जेव्हा महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसतील तेव्हा ठरवतील. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, तीन पक्ष असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वेळ लागत आहे. आता शिवसेनेला किती खाते मिळतील? हे देखील आम्हाला माहिती नाही. याचा अर्थ असा आहे की आम्ही सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे आता आमच्या पक्षाला किती मंत्रि‍पदे घ्यावी? कोणती खाते घ्यावे? हे सर्व एकनाथ शिंदे ठरवतील”, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

“शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याकडून अशी कोणतेही वक्तव्य नाही की आम्हाला एवढे खाते मिळतील? किंवा आम्हाला हे मंत्रिपद मिळेल. याचा अर्थ हा आहे की आमच्यामध्ये एक वाक्यता आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना गृहखातं मिळावं, यासाठी सर्वच आमदारांनी आग्रह केला होता. तसेच आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही. आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह जरी धरलेला असला तरी यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार हा एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे”, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

“आम्हाला कोणतं मंत्रिपद मिळेल? काय मिळेल? याबाबत आम्ही कोणीच असं सांगितलं नाही की आम्हाला मंत्री करा. याचं कारण म्हणजे आमचा नेता दूरदृष्टीचा आहे. त्यांना सर्व गोष्टी कळतात. आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं आहे की तुम्ही निर्णय घ्या. मग तुम्ही जी जबाबदारी आमच्यावर द्याल ती आम्ही पार पडणार आहोत”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet expansion shivsena shinde group leader gulabrao patil on cabinet expansion and home ministry mahayuti politics gkt