Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे. निकाल लागल्यानंतर तब्बल २२ दिवसांनी आज मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे. उद्यापासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज नागपूर विधीमंडळात शपथविधीचा सोहळा पार पडत आहे. महायुतीच्या तीनही पक्षांनी संभाव्य मंत्र्यांना फोन करून शपथविधीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वाट्याला १० मंत्रिपदे आल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. अजित पवारांचा शपथविधी आधीच झाला आहे. त्यामुळे आज उर्वरित ९ आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. अजित पवार यांनीही भाजपाप्रमाणेच धक्कातंत्राचा वापर करत काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम या जुन्या मंत्र्यांना अद्याप मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाही.

हे वाचा >> Maharashtra Cabinet Expansion Live Updates: मुंडे बहीण-भावाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ; पंकजा मुंडे कन्फर्म, धनंजय मुंडेंनाही फोन

या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन

आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तामामा भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ
मकरंद पाटील
इंद्रनील नाईक
धनंजय मुंडे
माणिकराव कोकाटे

आदिती तटकरे, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे हे महायुतीच्या मंत्रिमंडळात होते. तर दत्तामामा भरणे यांनी मविआच्या मंत्रिमंडळात काम केले होते. त्यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. तर बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक आणि माणिकराव कोकाटे यांना पहिल्यांदाच मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

रोहित पवार,जयंत पाटील सहभागी होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील हे देखील आज महायुतीच्या मंत्र्यांसोबत शपथ घेतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र ही चर्चा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी झिडकारून लावली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “हे बहुतेक गॉसिपच असावे, यामध्ये तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचा संबंध असण्याचे कारण नाही… त्यांच्याशी संपर्कही नाही आणि संबंधही नाही. आम्ही वेगळा विचार करूनच सव्वा वर्षापूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रातील जनतेने अभूतपूर्व यश महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत दिले आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet expansion who will take minister oath from ncp ajit pawar faction chhagan bhujbal dilip walse patil kvg