अकोला : राज्यातील १७ जिल्ह्यांतील जनावरांवर लम्पी आजाराचे संकट निर्माण झाले आहे.त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील जनावरांची वाहतूक, बाजार पूर्णपणे बंद करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असले तरी लसीकरणास प्राधान्य दिले जात आहे. लम्पी या जनावरांच्या त्वचेच्या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. जनावर दगावल्यास पशुपालकास मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. सद्यस्थितीत संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, आंतर तालुकास्तरावर जनावरांची ने-आण बंद करण्यात आल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>> लंपी आजाराच्या संकटाने दूध उत्पादक धास्तावला
राज्यात पशुवैद्यकांची ६०० रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तातडीची स्थिती पाहता खासगी पशुवैद्यकांची लसीकरणासाठी मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील पशुविज्ञान विद्यापीठे व त्यांच्या प्रयोगशाळांनी शासकीय प्रयोगशाळांशी समन्वय राखावा. लसीकरण व उपचारासाठी सर्व तज्ज्ञ पशुवैद्यकांनी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हा आजार कसला?
लम्पी हा जनावरांच्या त्वचेवर होणारा रोग आहे. राज्यात चा शिरकाव गुजरात आणि राजस्थानमधून झाला. तेथे शेकडो जनावरांचा या रोगाने मृत्यू झाला. हा वेगाने पसरणारा रोग असून, त्याच्यावर औषध उपलब्ध नाही. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या , डास, गोचीड, चिलटे यांच्या मार्फत होतो.
स्थलांतराला स्थगिती..
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वर्षभरापूर्वी अकोल्यातील पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्थलांतराला स्थगिती देण्यात आली असून पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोल्यातच ठेवण्याचा प्रयत्न राहील, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.