Maharashtra CET Exam 2025 Timetable: राज्यभरातील तब्बल १३ लाख ४३ हजार ४१३ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या अशा CET परीक्षांना सुरुवात होत आहे. १९ मार्च ते ३ मे या कालावधीमध्ये या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांमध्ये एकूण १९ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून त्यानुसार त्या त्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेचं नियोजन प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे. या सर्व अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रवेश परीक्षा प्रक्रिया राबवली जात आहे.
MHT-CET परीक्षेला एमएड व पीएचडी अभ्यासक्रमांच्या परीक्षेने सुरुवात होणार असून एमएचटी-सीईटी परीक्षा शेवटी होणार आहे. महाराष्ट्रभरातून जवळपास १३ लाख ४३ हजार विद्यार्थ्यांनी या विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे. बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम, विधी तीन वर्षे व पाच वर्षे या अभ्यासक्रमांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असून इतर सर्व अभ्यासक्रमांची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यानुसार बुधवारपासून या परीक्षांना सुरुवात होत आहे.
कसं आहे परीक्षांचं वेळापत्रक?
प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार १९ मार्च ते ३ मे या कालावधीमध्ये या सर्व अभ्यासक्रमांसाठीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार…
अभ्यासक्रम | तारीख | परीक्षार्थी |
१९ मार्च | एम.एड | ३८०९ |
१९ मार्च | एम.पी.एड | २३८४ |
२३ मार्च | एमसीए | ५६२५७ |
२४ मार्च | बी.एड | ११६५८५ |
२७ मार्च | एम.एचएमसीटी | ८० |
२७ मार्च | बी.पी.एड | ६५९८ |
२८ मार्च | बी.एचएमसीटी | १४३६ |
२८ मार्च | बी.एड – एम.एड | ११३९ |
२९ मार्च | बी.डिझाईन | १३२८ |
१ एप्रिल | एमबीए/एमएमएस | १५७२८१ |
५ एप्रिल | फाईन आर्ट | २७८९ |
७ एप्रिल | नर्सिंग | ४७४९७ |
८ एप्रिल | डीपीएन/पीएचएन | ४७७ |
९ एप्रिल | एमएचटी – सीईटी (पीसीबी) | ३०१०७२ |
१९ एप्रिल | एमएचटी – सीईटी (पीसीएम) | ४६४२६३ |
२८ एप्रिल | विधी तीन वर्षे | ३३१३३ |
२९ एप्रिल | बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम | ५८३८४ |
३ मे | विधी तीन वर्षे | ८७९३७ |
कोणत्या अभ्यासक्रमासाठी किती परीक्षार्थी?
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नोंदणी झालेल्या १३ लाख विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी नोंद केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठा फरक दिसून येतो. एमएचटी-सीईटी अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक ७ लाख ६५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे एम.एड. अभ्यासक्रमासाठी ३ हजार ८०९ तर एम. पी. एड अभ्यासक्रमासाठी २ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वात कमी नोंदणी एम. एचएमसीटी अभ्यासक्रमासाठी आली आहे.