Loksatta 74th Anniversary Live, CM Uddhav Thackery : ‘लोकसत्ता’च्या ७४व्या वर्धापन दिनानिमित्ताने आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. ‘लोकसत्ता’ नरीमन पॉइंट येथे आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, अविनाश नारकर आणि मृणाल कुलकर्णी आदी मान्यवरांनी देखील विशेष उपस्थिती लावली असून यावेळी लोकसत्ता वर्षवेध २०२१ या अंकाचं देखील प्रकाशन करण्यात आलं.
वर्ल्ड वेब सोल्युशन्स या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिडको, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रुणवाल ग्रुप आणि रावेतकर ग्रुप कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. टीजेएसबी सहकारी बँक लि. कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर आहेत. – पर्यटन संचलनालय, महाराष्ट्र, वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रा. ली., पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे, दोस्ती रिअल्टी, अंजुमन इस्लाम, मुंबई, राष्ट्रीय केमिकल्स अँड फेर्टीलाइजर्स लि. हे पॉवर्ड बाय पार्टनर तर सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट एज्युकेशन पार्टनर आहेत. जमीन प्रा. लि. चं सहाय्य कार्यक्रम आयोजनाला लाभलं.
यावेळी भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त काही राष्ट्रीय नेत्यांच्या स्वातंत्र्यविषयक विचारांचं चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, अविनाश नारकर आणि मृणाल कुलकर्णी यांनी अभिवाचन देखील केलं.
माझे आजोबा सांगायचे, की टीका जरूर करा. पण त्यातून ज्याच्यावर टीका करताय, त्याच्यामध्ये शहाणपण यायला हवं. नुसतंच ओरबाडणं करू नका. तो बॅलन्स येणं महत्त्वाचं असतं.
सरकार चालवताना जो बॅलन्स करावा लागतो, तोही मी करतोच आहे. ती तारेवरची कसरत आहे. पण त्या तारा जुळल्या पाहिजेत.
स्वबळावर सत्ता आणणं प्रत्येक पक्षप्रमुखाचं स्वप्न असलंच पाहिजे. नसेल तर तो नालायक आहे त्या पदासाठी. पण आत्ताच्या परिस्थितीत महाराष्ट्रात कुणालाही स्वबळावर सत्ता मिळेल अशी परिस्थिती नाही. मग किमान समान कार्यक्रम घेऊन पुढे चला. स्वबळ फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर प्रत्येक गावात माझ्या पक्षाची शाखा असली पाहिजे. प्रत्येक वस्तीत शिवसेना असली पाहिजे. शिवसेनेशिवाय राजकारण पुढे सरकता कामा नये, एवढी ताकद असलीच पाहिजे.
केंद्र अनेक राज्यांची गळचेपी करतंय का?
तसे अनुभव येत आहेत. तुम्हाला केंद्रात संधी मिळाली आहे, राज्यात आम्ही मिळवली आहे म्हणा. पण त्यानंतर आम्ही जनतेची कामं थांबवली आहेत का? राज्यातल्या करोना काळातल्या कामांचं सर्वोच्च न्यायालयानं देखील कौतुक केलं आहे. त्यातही भ्रष्टाचाराचे आरोप केले. काढा बाहेर मग. शोधा काय शोधायचं ते.
आता प्रकल्पांच्या घोषणा होतील. कारण महापालिकांच्या निवडणुका येत आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर का होईना, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करावी. छत्रपतींच्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची तुमची कुवत आहे का? या भाषेसाठी दिल्लीसमोर हात पसरावे लागतायत.
संधी प्रत्येकाला मिळते, त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची, हे ज्याचं त्यानं बघायचं असतं. ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्या संधीची माती करायची असेल, तर तुम्ही कपाळकरंटे आहात.
इतर राज्यांत बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर या केंद्रीय यंत्रणांकडे यंत्रणाच नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. आपल्याकडे चिमूटभर सापडलं तर केवढा गहजब केला जातो. आपली तुळशी वृंदावनाची संस्कृती सोडून गांजा वृंदावनची संस्कृती रुजलीये, गांजाची शेती होतेय असं चित्र उभं करायचं. महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे. तुम्ही महाराष्ट्राचा आधार म्हणून उपयोग का करत नाही. महाराष्ट्र जणूकाही देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने राजकारण चाललंय. धाडीमागू धाडी सुरू आहेत. ठीक आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. दिवस बदलतात. ते लवकर बदलतील यासाठी प्रयत्न करू नका.
शिवसैनिक मुळात गरम रक्ताचा आहे. त्यामुळे जाऊ, तिथे वॉर्मिंग होतंच. शिवसेना ग्लोबल नाही, तर नॅशनल वॉर्मिंग तरी करतच आहे.
आवाज तोच आहे त्यातला खणखणीत पणा तोच आहे. पण पिढीप्रमाणे थोडा बदल व्हायला हवा. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, ते कधीच सोडणार नाही. जनतेची सेवा करणारी आमची सहावी पिढी आहे. त्याच्या आधीही आमचे पूर्वज धोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते असं म्हणतात. माझ्यावर टीका झाली की याला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही. मला नाहीच येत. मी भाषण करतो असं मला वाटत नाही. मला भाषण करताच येत नाही हे तुम्ही लोकांनीच ठरवून टाकलं हे बरंच झालं. बाळासाहेबांचा काळ दगडाची मूर्ती तयार करण्याचा होता. आता मूर्ती बनल्यानंतर त्या शिल्पकाराचा पोरगा त्या शिल्पावर घण घालत बसला, तर ती मूर्ती तुटेल. मूर्ती झाल्यानंतर तिच्यावर फुलं वाहायला हवीत.
आमच्यावर कुणी राजकारण लादलेलं नाही. माझीही आदित्यसारखी राजकारणात सुरुवात होत होती. मला बाळासाहेब म्हणाले होते की उद्धव एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही. जनतेवर लादणार नाही. पण तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणार देखील नाही. जर तुला जनतेनं स्वीकारलं तर तू तुझ्या वाटेनं पुढे जा. आता आदित्य त्याच्या वाटेनं पुढे जातोय. लोकांना पटलं तर ते त्याला स्वीकारतील. पक्ष एक आहे, विचार एक आहे. तो त्याच्या मार्गाने पुढे जातोय.
आता परिस्थिती अशी आहे, की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. आता लक्षात आलं आहे की ज्या हेतूने आम्ही युती केली होती, तो हेतू बाजूला पडला आहे. फक्त वाट्टेल त्या पद्धतीने सत्ता मिळाली पाहिजे यासाठी हिंदुत्वाचा देखील पावर होत आहे. काही शिवसैनिकांवर आमच्याकडूनही अन्याय झाला की त्यांना निवडणुका लढवायला देता आल्या नाहीत. तरी देखील ते शिवसेनेसोबत आहेत. आता राज्यातल्या शिवसैनिकांना लढण्यासाठी मोकळी वाट करून द्यायला पाहिजे. बघू.
आमचं सत्ताप्राप्ती हे स्वप्नच नव्हतं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण. पण लक्षात आलं की त्यासाठी राजकारणात यावं लागेल. युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही देश सांभाळा, राज्य आम्ही सांभाळतो. आता देशही तुम्ही जिंकलात, राज्यही तुम्ही जिंकलात, महापालिकाही तुम्हालाच पाहिजे, मग आम्ही धुणीभांडी करायची का? धुणीभांडी करायला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली नव्हती. धुणीभांडी करणाऱ्या मराठी माणसाला ताठ मानेनं उभं राहाता यावं, यासाठी शिवसेनेची स्थापना झाली.
ते ज्या पद्धतीने चालले आहेत, ते सुधारणार आहेत का? सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता वैचारिक पातळी पाताळात गेलीये का तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची याबाबत त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला.
कुणी कुणाला बांधील नसतं. आपण कुणासोबत आघाडीत असलो, आणि तो पक्ष चुकत असला, तर जे देशाच्या आणि राज्याच्या हिताचं असेल, ते मला करणं भाग आहे.
गेल्या रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री आले होते. यात भाजपा नको, यापेक्षा आम्हाला देश कसा हवाय, देशात कोणत्या पद्धतीने राजकारण चालायला हवं, देशाच्या राजकारणाला चांगली दिशा मिळायला हवी. गेल्या ७५ वर्षात काहीच झालं नाही हे सांगितलं जात आहे. पण सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन गेल्या ७५ वर्षांत आपल्याकडून काय चुकलं, काय व्हायला हवं होतं यावर देश पातळीवर चर्चा व्हायला हवी.
तुम्हाला लोकांची कामं करण्यासाठी सत्ता दिली आहे. एकमेकांवर चिखलफेक करायची, त्याला बदनाम करायचं आणि वाट्टेल ते आरोप करायचं आणि म्हणायचं बघा आम्ही कसे गंगास्नान करून पवित्र आहोत आणि हे कसे गटारात राहणारे आहेत हे दाखवण्याचे जे गलिच्छ प्रकार सुरू झाले आहेत. हे सुदृढ लोकशाहीसाठी हानीकारक आहे.
सत्ता कुणाला नको असते? रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू झालं आहे. ज्याप्रमाणे ही आक्रमणं होत आहेत. सत्ता मिळवा, पण तीसुद्धा आपल्याकडे लोकशाही आहे हे न विसरता प्रामाणिकपणे लोकांसमोर जाउन लोकांनी सत्ता दिली तर तुम्ही राज्य करा. पण आता सगळं मला हवंच, मतं नाही मिळाली तरी सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवीनच हा प्रकार देशाच्या राजकारणात नव्हता. त्यानी हे देशाचं राजकारण नासवून टाकलं आहे. विकृत करून टाकलं आहे. त्यातूनच देशात राज्य आणि केंद्र संघर्ष सुरू झाला आहे. हा सत्तापिपासूपणा आहे. केंद्रात बसलोय म्हणून राज्याची मुस्कटदाबी करायची या प्रवृत्तीचा सगळ्यांनी निषेध करायला हवा.
मधला करोनाचा काळ आव्हानात्मक होता. काही काळ मंत्रालयही बंद ठेवावं लागलं होतं. पुढच्या आठवड्यात अधिवेशन सुरू होतंय. ते झाल्यावर पुन्हा मंत्रालयात काम सुरू करणार. अधिवेशनातही मी जाणार.
अनेकांचा मी पुन्हा येईन यावर विश्वास नव्हता. पहिल्या वर्षी आल्यानंतर पुढच्या वर्षी येईन का असं वाटलं नव्हतं. पुन्हा येईन असं बोलून न येणं यापेक्षा हे बरं.
आता बराचसा मार्गावर आलो आहे. राजकीय नव्हे, पण शारिरीक शक्तीपात झाला होता. पूर्वपदावर येतोय. जिद्द आणि हिंमत असल्यावर काहीच अशक्य नसतं. हत्ती गेला, शेपूट राहिलंय. ते गेलं की पुन्हा मंत्रालयात सुरुवात करेन.