History of Chief Ministers of Maharashtra and Their Service Period: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीच पुन्हा सत्तेवर बसणार हे निश्चित झालं. पण त्यातही मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार? याची मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून आलं. ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं निवडणुका लढवल्या त्या एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करायचं की ज्यांच्या नेतृत्वाखाली २०२१ ला सत्ताबदल झाला, त्या देवेंद्र फडणवीसांना राज्याची धुरा सोपवायची, यावर महायुतीमध्ये मोठा खल झाल्याचं पाहायला मिळालं. जवळपास अडीच वर्षं एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते.
२६ नोव्हेंबरला विद्यमान विधानसभेची मुदत संपली आणि एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर राज्यपालांनी जबाबदारी सोपवली. त्यामुळे निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद जसं निवडणुकांच्या आधी चर्चेत होतं, तसंच ते निवडणुकांनंतरही चर्चेत राहिलं. या पार्श्वभूमीवर राज्याला आजतागायत लाभलेले मुख्यमंत्री कोण होते, सर्वाधिक काळ आणि सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदावर कोण राहिलं? हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत २६ वेळा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात २० जणांनी राज्याच्या प्रमुखपदाची जबाबदारी पार पाडली. यापैकी सर्वाधिक तीन वेळा शरद पवारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याखालोखाल शंकरराव चव्हाण व देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्रीपदी कोण?
मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाचा विचार करता महाराष्ट्राच्या प्रमुखपदी वसंतराव नाईक हे राहिले आहेत. वसंतराव नाईक यांनी ५ डिसेंबर १९६३ ते २१ फेब्रुवारी १९७५ असं तब्बल ११ वर्षं ७८ दिवस सलग मुख्यमंत्रीपद भूषवलं. त्यापाठोपाठ शरद पवारांनी तीन टर्म मिळून जवळपास साडेसहा वर्षं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस दोन टर्म मिळून ५ वर्षं १७ दिवस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते.
राज्याच्या आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांची यादी
क्र. | नाव | वर्ष | कार्यकाळ |
१ | यशवंतराव चव्हाण | १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२ | २ वर्षं ३ दिवस |
२ | मारोतवार कन्नमवार | २० नोव्हे. १९६२ ते २४ नोव्हें. १९६३ | १ वर्षं ४ दिवस |
३ | पी. के. सावंत | २५ नोव्हें. १९६३ ते ५ डिसें. १९६३ | १० दिवस |
४ | वसंतराव नाईक | ५ डिसें. १९६३ ते २१ फेब्रु. १९७५ | ११ वर्षं ७८ दिवस |
५ | शंकरराव चव्हाण | २१ फेब्रु. १९७५ ते १७ मे १९७७ | २ वर्षं ८५ दिवस |
६ | वसंतदादा पाटील | ५ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८ | १ वर्षं ६२ दिवस |
७ | शरद पवार | १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रु. १९८० | १ वर्षं २१४ दिवस |
राष्ट्रपती राजवट | १७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० | ११२ दिवस | |
८ | ए. आर. अंतुले | ९ जून १९८० ते २१ जाने. १९८२ | १ वर्षं २२६ दिवस |
९ | बाबासाहेब भोसले | २१ जाने. १९८२ ते २ फेब्रु. १९८३ | १ वर्षं १२ दिवस |
१० | वसंतदादा पाटील | २ फेब्रु. १९८३ ते ३ जून १९८५ | २ वर्षं १२१ दिवस |
११ | शिवाजीराव पाटील निलंगेकर | ३ जून १९८५ ते १२ मार्च १९८६ | २८२ दिवस |
१२ | शंकरराव चव्हाण | १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८ | २ वर्षं १०६ दिवस |
१३ | शरद पवार | २६ जून १९८८ ते २५ जून १९९१ | २ वर्षं ३६४ दिवस |
१४ | सुधाकरराव नाईक | २५ जून १९९१ ते ६ मार्च १९९३ | १ वर्षं २५४ दिवस |
१५ | शरद पवार | ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५ | २ वर्षं ८ दिवस |
१६ | मनोहर जोशी | १४ मार्च १९९५ ते १ फेब्रु. १९९९ | ३ वर्षं ३२४ दिवस |
१७ | नारायण राणे | १ फेब्रु. १९९९ ते १८ ऑक्टो. १९९९ | २५९ दिवस |
१८ | विलासराव देशमुख | १८ ऑक्टो. १९९ ते १८ जाने. २००३ | ३ वर्षं ९२ दिवस |
१९ | सुशीलकुमार शिंदे | १८ जाने. २००३ ते १ नोव्हें. २००४ | १ वर्षं २८८ दिवस |
२२ | विलासराव देशमुख | १ नोव्हें. २००४ ते ८ डिसें. २००८ | ४ वर्षं ३७ दिवस |
२१ | अशोक चव्हाण | ८ डिसें. २००८ ते ११ नोव्हें. २०१० | १ वर्षं ३३८ दिवस |
२२ | पृथ्वीराज चव्हाण | ११ नोव्हें. २०१० ते २८ सप्टें. २०१४ | ३ वर्षं ३२१ दिवस |
राष्ट्रपती राजवट | २८ सप्टें. २०१४ ते ३० ऑक्टो. २०१४ | ३२ दिवस | |
२३ | देवेंद्र फडणवीस | ३१ ऑक्टो. २०१४ ते १२ नोव्हें. २०१९ | ५ वर्षं १२ दिवस |
राष्ट्रपती राजवट | १२ नोव्हें. २०१९ ते २३ नोव्हें. २०१९ | ११ दिवस | |
२४ | देवेंद्र फडणवीस | २३ नोव्हें. २०१९ ते २८ नोव्हें. २०१९ | ५ दिवस |
२५ | उद्धव ठाकरे | २८ नोव्हें. २०१९ ते ३० जून २०२२ | २ वर्षं २१४ दिवस |
२६ | एकनाथ शिंदे | ३० जून २०२२ ते २६ नोव्हें. २०२४ | २ वर्षं १४९ दिवस |
सर्वात कमी कार्यकाळ मुख्यमंत्री कोण?
एकाकडे देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्तींमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असले, तरी सर्वात कमी काळ म्हणजे अवघ्या ५ दिवसांसाठी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिल्याची नोंदही त्यांच्याच नावावर आहे. अजित पवार यांच्यासह फडणवीसांनी २०१९ साली भल्या सकाळी शपथ घेतली होती. त्यानंतर पाचच दिवसांत त्यांचं सरकार कोसळलं होतं.
महाराष्ट्रात आजपर्यंत तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यात सर्वात आधी १७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० अशी ११२ दिवसांसाठी, त्यानंतर २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४ अशी ३२ दिवस आणि अगदी चार वर्षांपूर्वी २०१९ च्या सत्तासंघर्षादरम्यान १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर अशी ११ दिवस राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.