Devendra Fadnavis Oath Ceremony : विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यानंतर आज (५ डिसेंबर) रोजी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली.
महाविधीच्या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते उपस्थित होते. या भव्य सोहळ्याला मनोरंजन तसेच क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी देखील उपस्थिति लावल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईतील आझाद मैदान येथे पार पडलेल्या शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणाऱ्यांमध्ये अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान हे दोघं पहिले होते. यासंबंधीचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. ज्यामध्ये शाहरूख खान आणि सलमान खान एकमेकांची गळाभेट घेताना पाहायला मिळत आहेत. तर दुसर्या एका व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्यासोबत बसलेला दिसत आहे.
याशिवाय संजय दत्त, रणवीर सिंह, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित नेने, जॅकी श्रॉफ आणि अर्जून कपूर या कलाकारांनी देखील देवेंद्र फडणवीस याxच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील या सोहळ्याला हजेरी लावली.
हेही वाचा>> “मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, राज्याचा मुख्यमंत्री म्हण…
जीवाला धोका तरी सलमानची हजेरी
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवुड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सातत्याने धमक्या येत आहेत. यादरम्यान बुधवारी (४ डिसेंबर) माटुंगा येथे शुटिंगमध्ये घुसून एका व्यक्तीनं ‘बिश्नोई को बुलाऊं क्या?’ अशी धमकी सलमान खान याला दिली होती. जीवाला धोका असताना देखील सलमान खानने देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज (५ डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्या शपथविधीनंतर एकच जल्लोष पाहण्यास मिळाला. या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.