राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबत केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता असं वक्तव्य केलं असून सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांकडून जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असून, जोरदार टीका होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो,” असं जितेंद्र आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. त्यांच्या याच विधानावरुन वाद निर्माण झाला आहे.

“जितेंद्र आव्हाड, औरंगजेबाच्या प्रेमाखातर अजून कोणत्या थराला जाणार?” गिरीश महाजन यांचा सवाल

जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबासंदर्भात केलेल्या विधानानंतर आशिष शेलारांचं राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र; म्हणाले, “दाऊदशी…”

एकनाथ शिंदेंची टीका –

“इतिहास पुसण्याचा, बदलण्याचा जो काही प्रयत्न सुरु आहे त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. औरंगजेबाच्या बाबतीत कोणाचं प्रेम ऊतू जात आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, महाराष्ट्रातील अनेक मंदिरं तोडून टाकली, उद्ध्वस्त केली, माय-भगिनींवर अत्याचार केले त्याचा पुळका कोणाला येतो यावरुन त्यांची वृत्ती कळून येते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवरील त्यांचं प्रेम वृत्तीतून दिसून येतं. याचा निषेध करावा तितका कमी आहे,” अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm ekanth shinde on ncp jitendra awhad over aurngazeb sgy