Eknath Shinde Birthday Wishes to Uddhav Thackeray: राज्यात सध्या खरी शिवसेना कोणाची यावरुन शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये संघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झालं असून यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून बंडखोरांवर जोरदार टीका केली जात आहे. बंडखोर आमदारांकडूनही या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. हा संघर्ष सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महत्वाचं म्हणजे यामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरेंनी ‘पालापोचाळा’ म्हणत टीका केल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “आमची लायकी…”

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पालापाचोळा, पानगळ…”

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा देतानाही त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री केला आहे. एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे पक्षप्रमुख मानण्यासही नकार दिल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

एकनाथ शिंदेंनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे –

“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना,” असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने मातोश्रीवर शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून बंडखोर आमदारांना आपली ताकद दाखवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल.

‘सामना’मधील मुलाखतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे-शिंदे आमने-सामने

उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत पक्षातील बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. बंडखोरांनी मी रुग्णालयात बेशुद्ध असतानाही सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसंच बंडखोरी करणारे केवळ पालापाचोळा आहेत. त्यांची पानगळ होऊन पक्षाला नवीन पालवी फुटेल असा टोलाही लगावला. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तरही दिलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांना आणखी काही बोलायचं आहे ते बोलून होऊ द्या. पूर्ण बोलून झालं की मग मी एकत्रित त्यावर बोलन. त्यांना वाटतं आम्ही पालापाचोळा आहे, पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. हे जनतेला माहिती आहे. इतिहास घडवणारे कोण असतात हे लोकांनी पाहिलं आहे.”

“आमची लढाई सत्तेसाठी नाही. आमची लढाई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी होती. त्यातूनच आम्ही ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालापाचोळा, पानगळ जे म्हणायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm eknath shinde birthday wishes to shivsena uddhav thackeray sgy
Show comments