Eid-ul-Adha Holiday : हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ ईद-उल-अजहा (बकरी ईद) २९ जून रोजी साजरी होणार आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने बकरी ईद निमित्ताने २८ जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. सार्वजनिक सुट्टीत बदल करण्यासाठी काँग्रेस नेते नसीम खान आणि मुदास्सर पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. काँग्रेस नेत्यांची ही विनंती मान्य करण्यात आली असून आता बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी गुरुवारी २९ जून रोजी असणार आहे. महाराष्ट्र सरकारने अधिसूचना काढून यासंदर्भातील घोषणा केली आहे.
हेही वाचा >> औरंगाबाद: “आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी करणार नाही”, मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय
मुस्लिम समुदायाचे लोक रमजान संपल्यावर किमान ७० दिवसांनंतर बकरी ईदचा सण साजरा करतात. याला ईद-उल-जुहा देखील म्हणतात. ईद-उल-फितर (मिठी ईद) नंतर मुस्लिम समुदायाच्या सर्वात मोठ्या सणांमध्ये एक आहे तो म्हणजे बकरी ईद. या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी बकर्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी दिल्यानंतर मांस समान तीन हिश्श्यांमध्ये गोरगरीब व अनाथ, आप्त व नातेवाईक आणि स्वत: व शेजारी यांना वाटप केले जाते. सकाळच्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी देण्यात येते. मुस्लिम बांधवांमध्ये चंद्र दर्शनाला अत्यंत महत्त्व असते, त्यामुळे चंद्र दर्शनानंतर ईद साजरी केली जाते.
हेही वाचा >> बकरी ईदनिमित्त नागरिकांसाठी महानगरपालिकेचा मदत क्रमांक जाहीर
त्यानुसार, बकरी ईद २९ जून रोजी येत आहे. परंतु, राज्य सरकारने २८ जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. याबाबत काँग्रेस नेते नसीम खान आणि मुदास्सर पटेल यांनी सुट्टीची तारीख बदलण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना विनंती केली होती. ही विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे. २८ जूनची सार्वजनिक सुट्टी रद्द करून २९ जून रोजी करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सो.ना.बागुल यांनी २६ जून रोजी जारी केला आहे.