उद्धव ठाकरे भाजपाच्या वरिष्ठांशी बोलले तर सुवर्णमध्य निघू शकतो. गोष्टी अजून इतक्याही बिघडलेल्या नाहीत. अजूनही सावरलं जाऊ शकतं असं विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. “उद्धव ठाकरे थोडासा अभिमान बाजूला ठेवून कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलले तर यातून सुवर्णमध्य निघू शकतो अशी माझी भावना आहे,” असं ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत. “उद्घव ठाकरेंचे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण हा तोडगा महाराष्ट्र स्तरावर नाही तर वरिष्ठ स्तरावरच निघू शकेल,” असं त्यांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला महाराष्ट्राबाहेरील शिवसैनिकांचे वारंवार फोन येत असतात. उद्धव ठाकरेंपासून लांब जाऊ नका अशी भावना ते व्यक्त करत असतात. काही गोष्टींमध्ये सुवर्णमध्य साधावा लागतो ही गोष्ट खरी आहे,” असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह जाणार? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले “तयारी ठेवा, नवं चिन्ह…”

“उद्धव ठाकरे धनुष्यबाण चिन्हासंबंधी काय म्हणाले त्यावर मी भाष्य करणार नाही. पण कुठेतरी अहंकाराच्या पुढे जाऊन कार्यकर्त्यांची भावना जपण्याची ही वेळ आहे. महाराष्ट्रातील स्तरावर जे काही घडायचं ते घडून गेलं आहे. नवीन सरकार आलं असून त्यांनी काम सुरु केलं आहे. पण हा वाद संपला पाहिजे अशी भावना प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे,” असंही केसरकर म्हणाले आहेत.

सूरतला गेलेल्या बंडखोर शिवसेना आमदाराचा खुलासा; म्हणाले “काहीच सामान घेतलं नव्हतं, अंगावरचे कपडे…”

पक्षचिन्हावर दावा करणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी हा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं सांगितलं. “पण हेदेखील खरं आहे की, जे महाराष्ट्रात घडलं तेच आता दिल्लीत घडत असल्याचं आपण भावना गवळींच्या निमित्ताने पाहिलं आहे. समजूत काढण्याऐवजी लोकांवर कारवाई केली जात आहे. ही वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आहे. यासाठी कोण सल्ले देत आहेत, हे माहिती नाही. पण शिवसेना-भाजपा एकत्र आलं पाहिजे अशी मागणी होत असल्याची वस्तुस्थिीती मान्य कऱणार आहात की नाही? ती मान्य झाली तर यातून नक्कीच मार्ग निघू शकतो,” असंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना आवाहन

विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. त्याआधी निवडणूक आयोगासमोरही दोन्ही गट आमने-सामने असतील. मात्र यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन केलं आहे.

कोणीही गाफील राहू नका आणि गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांना केलं आहे. सर्वतोपरी लढाई लढू, पण चिन्ह हातून गेल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कमीत कमी कालावधीमध्ये नवं चिन्ह लोकांपर्यंत पोहचावं म्हणून कामाला लागा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. धनुष्यबाण चिन्ह गेल्यास उद्धव ठाकरेंसमोर मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांमध्ये मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm eknath shinde deepak kesarkar uddhav thackeray shivsena bjp narendra modi amit shah sgy