राज्यात आमदारांसोबत बंड पुकारत सत्तांतर करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. लिलाधर डाके यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे आमदार, खासदार फोडल्यानंतर आता ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चा वळवल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे मनोहर जोशी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले –
“शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची ही सदिच्छा भेट होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस कऱण्यासाठी आलो होतो. शिवसेना वाढवण्यात त्यांचं मोठं योगदान असून, ते मी जवळून पाहिलं आहे. बाळासाहेबांसोबत सुरुवातीपासून जे नेते होते त्यामध्ये लिलाधर डाकेदेखील होते. आनंद दिघे आणि त्यांचे जवळचे संबंध होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. शिवसेनेच्या वाढीत त्यांच्यासारख्या नेत्यांचं फार मोठं योगदान आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“मंत्रीपद मिळूनही त्यांची राहणी अगदी साधी असून, स्वत:साठी काही निर्माण केलं नाही. पण जे केलं ते शिवसेना या चार अक्षरांसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी काम केलं. अशा सर्व नेत्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे बाळासाहेबांची शिवसेना पुढे गेली आहे. एक ज्येष्ठ नेते म्हणून कार्यकर्त्याच्या रुपाने त्यांना भेटण्यासाठी आलो होतो,” असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
मनोहर जोशींची भेट घेणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेसाठी फार मोठं योगदान असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार आहे. यांच्या अनुभवाचा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी जितका उपयोग करुन घेता येईल तितका करुन घेणार”.
“लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल”
“लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मी आणि फडणवीसांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, पेट्रोल-डिझेल स्वस्त केलं, दुष्काळग्रस्त भागात पाणी वळण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतही अनेक निर्णय घेण्यात आले. राज्याच्या हिताचे अनेक प्रकल्प पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकार अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सरकाचं काम आम्ही कुठे थांबू दिलेलं नाही. जनतेच्या हितामध्ये कोणतीही बाधा येणार नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.