आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात झाली असून शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय बांगर प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. संतोष बांगर यांनी सोमवारी हिंगोलीतील एका मध्यान्ह भोजन केंद्रावरील निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा मुद्दा उपस्थित करत संबंधित केंद्राच्या व्यवस्थापकालाच कानशिलात लगावली होती. तर दुसरीकडे प्रकाश सुर्वे यांनी हात पाय तोडण्याची भाषा केल्यानेही विरोधकांकडून टीका होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय बांगर प्रकरणाची दखल घेतली असून त्यांनी समज दिली आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
“हे एकनाथ शिंदेंना पटतं का? सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?”, अजित पवार संतापले
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओके’, ‘गद्दार हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान विरोधकांनी हाच आक्रमकपणा सभागृहात दाखवल्यास त्यांना जशास तसं उत्तर द्या अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपलं सरकार चांगलं काम करत असल्याची माहिती घराघरात पोहोचवा अशी सूचना आमदारांना केली आहे. आपण हाती घेतलेली कामं, योजना, प्रकल्प आणि विकासकामं याबद्दल लोकांना माहिती द्या असं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी संजय बांगर यांना समज देत मुद्दा योग्य होता, पण पद्धत चुकीची होती असं सांगितलं.
संजय बांगर प्रकरणाची जोरदार चर्चा
हिंगोलीतील शिंदे गटाचे आमदार संजय बांगर यांनी स्थानिक मध्यान्न भोजन केंद्राच्या व्यवस्थापकालाच जेवणाच्या निकृष्ट दर्जावरून कानशिलात लगावली होती. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बांगर यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली. मात्र, “असे प्रकार होत असतील तर मी कितीही वेळा कायदा हातात घेण्यास तयार आहे”, असं म्हणत बांगर यांनी आपल्या कृत्याचं समर्थन देखील केलं आहे.