पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. संजय राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावण्यात आली. तपासादरम्यान संजय राऊत यांच्या घऱी साडेअकरा लाखांची रक्कम सापडली होती. त्यापैकी १० लाखांच्या नोटांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशांवर तुमचं नाव असून शिवसेनेकडून चौकशीची मागणी होत असल्याचं एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं. यावर ते म्हणाले “माझी चौकशी करण्यापेक्षा, ज्यांच्या घरात पैसे सापडले आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे”. संजय राऊतांची चौकशी सुरु असून जे काही सत्य असेल ते समोर येईल असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.
१० लाखांच्या रकमेवर शिंदेंचं नाव
संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर रविवारी (३१ जुलै) सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले. सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही ‘ईडी’कडून शोधमोहीम राबवण्यात आली. नऊ तास चाललेल्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असून ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्याची माहिती आहे.
शिंदे गटाने मांडली बाजू
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी “एकनाथ शिंदेंच्या विरोधात काही करायचं असेल आणि त्यासाठी अयोध्येला जायचं असल्याने ते पैसे राखीव ठेवले असल्याची शक्यता आहे. प्रत्येक पैशाचा स्त्रोत दाखवावा लागतो आणि तो संजय राऊतांकडे असणार. ते हुशार, बुद्धिमान असून मुद्दाम असं काही लिहिणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा याच्याशी काही संबंध नाही,” असं सांगितलं होतं.
“आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा आमदारांना पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर आम्ही त्यांना आमची घरं तपासून पाहा, पैसै सापडणार नाहीत असं आवाहन केलं होतं. कारण हा पैशांसाठी केलेला उठाव नव्हता,” असं केसरकर म्हणाले होते.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याने सध्या चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीसंबंधी बोलताना एकनाथ शिंदेंनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी आशा व्यक्त केली. आदित्य ठाकरेंच्या सभांसंबंधी बोलताना त्यांना सांगितलं की “लोकशाहीत प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार असतो. जनता सुज्ञ असून त्यांना निर्णय घ्यायचा आहे”.
मंगळवारी पुणे दौरा
“माझा दोन दिवसांपासून नाशिक, मालेगाव, वैजापूर, संभाजीनगर असा दौरा होता. या दौऱ्यात अनेक बैठका झाल्या असून अनेक महत्वाचे प्रश्न तातडीन सोडवण्यास सांगितलं. पुण्यातही अशाच प्रकारचा दौरा असून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाचा तसंच इतर कामाचा आढावा घेतला जाईल,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.