शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंगा बंद झाला अशा शब्दांत टोला लगावला आहे. औरंगाबादमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी ‘भोंगा नीट करा रे’ असं सांगताना अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर टीका केली. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप त्यांनी केला.
नेमकं काय झालं?
एकनाथ शिंदे औरंगाबादमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनासाठी पोहोचले होते. यावेळी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, ‘जरा तो भोंगा नीट करा’ अशी सूचना करताना ‘एक भोंगा तिकडे आत गेला’ असा टोला लगावला. यानंतर त्यांनी उपस्थितांना ‘आवाज येतोय का?’ अशी विचारणा केली. उपस्थितांनी होकार देताच ‘अरे आता येणारच ना…आठ वाजताचा भोंगा बंद झाला आहे,’ असा अप्रत्यक्ष टोला लगावला.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांवर गंभीर आरोप केला. “त्यांनी आम्हाला पण तुरुंगात घालण्याचा विचार केला होता. आमची देखील बदनामी केली,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे बोलताना शिंदे यांनी, “ठीक आहे, आम्ही ते विसरुन गेलो. या सर्वांना मी आगोदरच सांगितलं की समोरच्याने खालच्या पातळीवर जाऊन आरोप केल्याने आम्ही तसं करणार नाही. आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ” असंही म्हटलं.
…अन् ईडीचे पथक संजय राऊतांच्या घरी पोहोचले
संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले. सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही येथेही ‘ईडी’कडून शोधमोहीम राबवण्यात आली. यापूर्वी ‘ईडी’ने तीनवेळा त्यांना समन्स बजावले होते. मात्र, २७ जुलैला ‘ईडी’ने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले असताना राऊत चौकशीला गैरहजर राहिले होते. त्यानंतर रविवारी ‘ईडी’चे पथक राऊत यांच्या घरी पोहोचले.
Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…
बेलार्ड पिअर येथील कार्यालयात चौकशी व अटक
राऊत यांच्या खोलीतील कागदपत्रे आणि दस्तावेज ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी तपासले. यावेळी साडेअकरा लाख रुपये ‘ईडी’ने जप्त केले. त्यानंतर याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी आपल्याला ‘ईडी’ कार्यालयात यावे लागेल, असे ‘ईडी’कडून राऊत यांना सांगण्यात आले. साडेनऊ तासांच्या ‘ईडी’च्या कारवाईनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास राऊत यांना घेऊन ‘ईडी’ अधिकारी बेलार्ड पिअर येथील कार्यालयाकडे निघाले. निवासस्थानाबाहेर निघताना राऊत यांनी गाडीतून हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले. साडेपाचच्या सुमारास राऊत ‘ईडी’च्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात दाखल झाले. तेथे त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी राऊत यांचे भाऊ सुनील राऊत आणि वकील ‘ईडी’ कार्यालयाबाहेर उभे होते. रात्री उशीरापर्यंत ही चौकशी चालली होती. याच चौकशीनंतर राऊत यांना अटक करण्यात आली.
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संताप
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या घरी ‘ईडी’चे पाहुणे दाखल झाले. हे काय चालले आहे? हे सगळे कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चालले आहे की, लाज-लज्जा सोडून देशात दडपशाही सुरू आहे, असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपावर सोडले. या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, मराठी माणसाचा पराक्रम काय असतो, हे अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ, असा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला.