सातारा: महायुतीला राज्यात बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. मुंबईत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. दिल्ली येथील बैठकीनंतर मुंबईत महायुतीची पुढील बैठक होणार होती. मात्र ही बैठक टाळून शिवसेना नेते व काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सायंकाळी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी साताऱ्यातील आपल्या दरे गावी पोहोचले आहेत. या वेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी केवळ मी विश्रांतीसाठी आलो आहे, नंतर बोलतो असे सांगून संवाद टाळला. नेहमी गावी आल्यावर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधणारे शिंदे काही न बोलल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
हेही वाचा : “शिवसेनेची गृहमंत्रीपदाची मागणी, भाजपाचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, मीडियासमोर वक्तव्य करून…”
मुंबईतील सत्ता स्थापनेची गडबड व बैठका सोडून शिंदे काल दोन दिवसांसाठी गावी पोहोचले आहेत. त्यामुळे मुंबई येथे होणाऱ्या बैठका आता दोन दिवस होणार नाहीत. दिल्लीतील बैठकीनंतर होणाऱ्या बैठकांना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी होणार होते. दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे विविध प्रस्ताव सादर केले. मात्र, त्यावर भाजपने पर्याय दिला आहे. शिंदे यांनी प्रस्तावाला होकार दिल्यानंतरच सत्ता स्थापनेच्या हालचाली होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली. मात्र गावी पोहोचल्यावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी काहीही संवाद केला नाही. या वेळी पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.