जून महिन्यामध्ये राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीला शिंदे गट पुन्हा जाणार असल्याच्या वृत्तावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिक्कामोर्तब केलं. शिर्डीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शिंदेंनी आम्ही गुवाहाटीला जाणार असल्याचं सांगितलं. मात्र त्यांनी नेमका हा दौरा कधी आयोजित केला जाणार आहे, यामध्ये शिंदे गटातील सर्व आमदार जाणार का यासंदर्भातील सविस्तर माहिती शिंदेंनी दिलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात जूनमध्ये एका आठवड्याच्या फरकाने राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. १० जूनला झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्या वेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून पहिला धक्का दिला. त्यानंतर २० जूनला १० जागांसाठी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करून भाजपाने दुसरा धक्का दिला. त्याच वेळी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावत २५-३० आमदारांसह रातोरात सुरत गाठली. त्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपच झाला. त्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास सरकार कोसळले.

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान झाले, मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गायब झाले. काही वेळानंतर ते थेट सुरतला पोहोचल्याचे समजले. तेथून दुसऱ्या दिवशी त्यांचा मुक्काम गुवाहाटीला हलविण्यात आला. शिवसेनेतील ४० बंडखोर आमदार व १० अपक्ष आमदार अशा ५० आमदारांचा गुवाहाटीतील एका आलिशान हॉटेलमध्ये आठ दिवस मुक्काम होता. त्या मु्क्कामातच सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांना ‘काय डोंगार, काय झाडी, सारे ओके’ हे दिव्य काव्य स्फुरले. ३० जूनला एकनाथ शिंदे  गोवा मार्गे मुंबईत दाखल झाले आणि त्याच रात्री त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

गुवाहाटीच्या मुक्कामात एकदा पहाटेच एकनाथ शिंदे कुठे तरी निघून गेल्याची चर्चा होती. मात्र ते आसाममधील प्रसिद्ध अशा कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते, असे सांगितले गेले. राज्यात सत्तांतर झाले, मुख्यमंत्रीपद मिळाले, सारे काही ओके झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटातील मंत्री व आमदार आता येत्या २१ नोव्हेंबरला पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत, असे समजते. या वृत्ताला शिंदेंनी दुजोरा दिला आहे.

शिर्डीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शिंदेंना तुम्ही गुवाहाटीला जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. मोजून चार वाक्यांमध्ये शिंदेंनी या प्रश्नाला उत्तर देताना कामाख्या देवीचाही उल्लेख केला. पत्रकाराचा प्रश्न ऐकताच शिंदेंनी, “हो जाणार आहे ना. गुवहाटीला जाणार आहे. कामाख्या देवीला जाणार आहे. त्यात काय?” असा प्रतिप्रश्न पत्रकारांना विचारला.

बरोबर पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि त्यात झालेल्या राजकीय पडझडीत सातत्याने चर्चेत आणि बातम्यांमध्ये झकळकलेल्या आसाममधील गुवाहाटीला शिंदे पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून जाणार आहेत. शिंदे गटातील मंत्री आणि आमदारही गुवाहाटीला जाणार आहेत. ही गुवाहाटीवारी आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी असल्याचं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यासाठी २१ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे समजते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm eknath shinde says we will go to guwahati with group mla scsg