पंढरीत सर्वत्र ज्ञानोबा माउली तुकारामचा गजर चालू असून आषाढी एकादशीदिनी राज्यातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे हस्ते शुक्रवारी महापूजा होत असून त्यांच्या समवेत विविध मंत्री, माजी मंत्री उपस्थित रहात आहेत. पंढरीत आलेले वारकरी हे विठ्ठल दर्शनासाठी रांगेत लागले असून प्रत्यक्ष पदस्पर्श दर्शनाची रांग ही मंदिरापासून तीन कि. मी. अंतरावर असलेल्या रिद्धी सिद्धी गणपती मंदिराजवळ गेली आहे. तर वैकुंठ स्मशानभूमी, गणपती मंदिराजवळ जी नऊ पत्राशेड उभारली आहेत त्यासह दर्शन रांगेत सुमारे ५० ते ६० हजार भाविक उभे आहेत.यात्रा काळात ऑन लाईन बुकिंग विठ्ठल दर्शनार्थीची सोय ही मुखदर्शन रांगेतून केली आहे.  मंदिरास देणगी देणाऱ्या भक्तासाठी नामदेव पायरी, पश्चिमद्वार, रुक्मिणी पटांगण येथे सोय केली आहे. तर विठ्ठलाचा प्रसाद म्हणून वारकऱ्यांना लाडू नेता यावेत यासाठी पश्चिमद्वार तसेच जुने चप्पल स्टँड येथे लाडू विक्री केंद्रे आहेत.
दोन दिवस वाकऱ्यांना रॉकेलसाठी तारांबळ सहन करावी लागली होती. प्रशासनाने दखल घेऊन जादा रॉकेल टँकर उपलब्ध करून दिले आहेत. ५५ ठिकाणी विक्री चालू आहे.आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरी वारकरीमय झाली असून रिमझिम पावसामुळे सर्वाची तारांबळ उडत आहे. तरी वारकरी विठ्ठल नामात दंग आहेत.
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आळंदी-देहू-पैठण-मुक्ताईनगर आदी ठिकाणच्या पालख्याचे आगमन पंढरीत झाले. संत ज्ञानेश्वर माउली पालखी नाथ चौकातील माउली मंदिरात तर संत तुकोबारायांची पालखी तुकाराम मंदिरात विसावली आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी असून (उद्या शुक्रवारी) एकादशीचा सोहळा होणार आहे. यंदा पावसाने सर्वत्र चांगली हजेरी लावली असल्याने शेतकरी, वारकरी सुखावला आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भक्त  रेल्वे, एसटी, खासगी वाहनातून पंढरीत येत आहेत.  एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणूनच विविध उपाययोजना करण्यात येतआहेत.