‘महाराष्ट्राला दुष्काळातून वाचव, चांगला पाऊस पडू दे, राज्यात सर्वत्र सुखसमृद्धी लाभो,’ अशी पांडुरंगचरणी प्रार्थना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केली. चव्हाण व त्यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा झाली.
मुख्यमंत्र्यांसमवेत महापूजा करण्याचा मान मंदिरातील दर्शनरांगेतील प्रथम वारकरी रामा निवृत्ती शेळके (वय ४८), सौ. प्रमिला रामा शेळके (वय४५) व मुलगा संगमेश्वर शेळके या शेतकरी कुटुंबाला मिळाला. शेळके गेलय़ा २२ वर्षांपासून पंढरीची वारी करीत आहेत. शेळके यांची तिसरी पिढी वारी परंपरा चालवत आहे.
महापूजेनंतर समितीच्या वतीने सभामंडपात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी केला. आळंदी- देहू- पैठण- मुक्ताईनगर- शेगाव येथून आषाढी एकादशीच्या सोहळ्याकरिता निघालेल्या दिंडी, पालख्या मंगळवारी संध्याकाळी पंढरीत दाखल होताच सारी पंढरीनगरी विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून जाऊन भक्तिमय होऊन गेली होती. आषाढी यात्रेवर दुष्काळ, महागाई याचे सावट, वरुणराजाची अवकृपा अशाही परिस्थितीत विठ्ठलावर भरवसा ठेवून सुमारे सात ते आठ लाखांवर भाविक यात्रेत सहभागी झाले होते. दर्शनाच्या ऑनलाइन बुकींगमुळे रांगांवरील ताण कमी झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm performs ashadhi ekadashi puja prays for good monsoon