Maharashtra CM swearing in ceremony Guest List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमताने विजय मिळाला आहे. भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षांनी दोनशेहून अधिक जागा, तर भाजपाने एकट्याने १३० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले जाणार आहे. यासाठी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ५ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या तयारीला सध्या वेग आला असून आज (३ डिसेंबर) शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपाच्या नेत्यांची बैठकदेखील झाली. या बैठकीनंतर या शपथविधी सोहळ्याला नेमकं कोण-कोण उपस्थित असणार याबद्दल भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
शपथविधी सोहळ्याला कोणते नेते आणि मंत्री उपस्थित राहणार यावर बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, शिवराज सिंह चव्हाण, नितीन गडकरी असे नऊ ते दहा केंद्रीय मंत्री येतील. त्याबरोबरच १९ राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या शपथविधीला येणार आहेत”.
“याबरोबरच सर्वधर्मीय गुरूवर्य, साधुसंतदेखील आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाला येणार आहेत. याशिवाय पाच ते दहा हजार लाडक्या बहिणी येतील, त्यांची वेगळी बसण्याची सोय केली आहे. मुंबईतील हाऊसिंग सोसायटींचे चेरमन-सेक्रेटरी असे पाच हजार लोक येतील. कार्यकर्ते आणि दोन ते अडीच हजार शेतकरी वेगवेगळ्या भागातून येणार आहेत . वारकरी, डब्बेवाले येणार आहेत आणि ४० ते ५० हजारांहून कार्यकर्ते सभास्थळी दिसतील”. असेही प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले.
शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीविषयी बोलताना लाड पुढे म्हणाले की, “आझाद मैदान येथे आम्ही ४० हजार खुर्च्यांचा बंदोबस्त केला आहे. त्याव्यतिरिक्त दोन हजार व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींची वेगळी व्यवस्था केली आहे. हा एक अभूतपूर्व सोहळा संपूर्ण देशात पाहायला मिळेल. महाराष्ट्रात जेथे एलईडी स्क्रीन आहेत तेथे हा सोहळा लाईव्ह दाखवला जाईल”.
उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार का?
प्रसाद लाड यांना उद्धव ठाकरेंना शपतविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना लाड म्हणाले, “हा प्रश्न तुम्ही जीएडींच्या सेक्रेटरींना विचारला तर बरं होईल. पण नियमानुसार माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सरकारच आमंत्रित करतं. येणं न येणं… का कोतेपणा दाखवणं हा त्यांचा प्रश्न आहे”, असे उत्तर लाड यांनी दिले.