तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणाला दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करुन मदत जाहीर केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “करोना संकट असताना त्यात तौते चक्रीवादळाने भर टाकली आहे. शेवटी वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर यावर नुकसान अवलंबून असतं. दुर्दैवाने काही मृत्यू झाले आहेत. कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल,” असं सांगितलं.
“हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय,” उद्धव ठाकरेंनी साधला मोदींवर निशाणा
“मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार,” असंही ते म्हणाले. मदतीचे निकष बदलण्यासाठी आपण मोदींसोबत झालेल्या बैठकीत सांगितलं होतं, त्यासंबंधी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.
शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत करण्याचे आदेशही त्यांनी रत्नागिरी येथे बैठकीदरम्यान दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2021
“वादळात नुकसान झालेल्यांना सरकार नाराज करणार नाही. सरकार त्यांच्यासोबत आहे, जे करता येणं शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली. विरोधक दोन दिवसांपासून कोकणात फिरत असताना मुख्यमंत्री चार तासांचा दौरा करत असल्याच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन तर नाही ना गेलो, जमिनीवर उतरलोय सांगत मोदींवर निशाणा साधला. “मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलेलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही,” असंही ते म्हणाले.
“हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय,” उद्धव ठाकरेंनी साधला मोदींवर निशाणाhttps://t.co/NPep3frZBo < येथे वाचा सविस्तर वृत्त #Tauktecyclone #CycloneTauktae #Maharashtra #CMUddhavThackeray #PMModi @OfficeofUT @ShivSena pic.twitter.com/ae70M4VwUm
— LoksattaLive (@LoksattaLive) May 21, 2021
मोदींनी गुजरातला जाहीर केलेल्या मदतीवर बोलताना, “मी येथील विरोधी पक्ष बोलतो तसा बोलणार नाही. मी जबाबदारीने बोलणार. पंतप्रधान आपल्याकडे आले नसले तरी ते महाराष्ट्रालादेखील व्यवस्थित मदत केल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. वादळापासून वाचण्यासाठी कायमची सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, त्यासाठी मदत करावी अशी विनंतीही यावेळी त्यांनी केली.