राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांविरोधात वक्तव्यं करत असताना आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी जाहीर केली आहे. भाजपाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस मवाळ भूमिका घेत असल्याने उद्धव ठाकरे नाराज आहेत. इतकंच नाही तर त्यांनी आपली ही नाराजी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे. शिवसेना भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना राष्ट्रवादी मात्र मवाळ भूमिका घेत असल्याचं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील सदस्यांना टार्गेट करत असताना राष्ट्रवादी मवाळ भूमिका घेत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादी भाजपाला आव्हान देण्याची वेळ आली तेव्हा बॅकफूटवर गेल्याच्या काही घटनाही सांगितल्या आहेत.
शिवसेनेचा आक्षेप असणाऱ्या घटना –
- १३ मार्चला मुंबई पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसीमधील सायबर विंगच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय बदलण्यात आला आणि त्याजागी मलबार हिलमधील घऱी जबाब नोंदवण्यात आला. यामुळे शिवसेना नाराज आहे. पोलिसांना सांभाळणारं गृहखातं सध्या राष्ट्रवादीकडे आहे.
- नवाब मलिक यांना ईडीने अचक केल्यानंतर शिवेसना आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलताना दोन्ह बाजूंनी संयम राखावा आणि गोष्टी हाताबाहेर जाण्यापासून रोखावं असं सांगितलं.
- गतवर्षी, जेव्हा सभापतींना शिवीगाळ केल्यामुळे भाजपाच्या 12 आमदारांना सभागृहातून एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं तेव्हादेखील अजित पवारांनी पुन्हा संयमाची भूमिका घेत आमदारांना काही तास किंवा एका दिवसासाठी शिक्षा होऊ शकते, पण १२ महिन्यांसाठी नाही असं म्हटलं होतं.
- २८ मार्च रोजी राज्यसभा खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी ट्विट केलं होतं की, “जर नरेंद्र मोदी जनादेश जिंकले आहेत आणि त्यांना जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून दाखवले जात असेल तर त्यांच्यात काही गुण असावेत किंवा त्यांनी चांगलं काम केलं असावे, जे विरोधी नेते शोधण्यात अक्षम आहेत.”
एका वरिष्ठ शिवसेना नेत्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “फक्त आम्हीच लढा देत आहोत. फक्त शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादीच्या वतीनेही आम्हीच लढत आहोत. शिवसैनिक फ्रंटफूटवर जाऊन लढत असताना राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर दिसत आहे. ज्याप्रमाणे त्यांना भाजपाविरोधात भूमिका घेतली पाहिजे तशी घेताना ते दिसत नाहीत”.
शिवसेना नेत्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कसे वारंवार महाविकास आघाडीने सुडाच्या राजकारण्यात न पडता कशा पद्दतीने फक्त राज्यातील विकासकामांकडे लक्ष द्यावं यावर भर देत असल्याकडेही लक्ष वेधलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांचा सामना करण्यासाठी पोलीस आपल्या बाजूला हवे आहेत आणि तिथेच मुळात हा वाद सुरु आहे. कारण गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर इंडियन एक्स्पेसशी बोलताना सांगितलं की, “आम्ही भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना काही शिवसेना नेत्यांना आमच्याकडे गृहखातं असल्याने अजून आक्रमक भूमिका घ्यावी असं वाटत आहे”.
शिवसेना नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये असणाऱ्या वैयक्तिक संबंधांमुळे ते कदाचित एकमेकंवर हल्ले करत नसावेत अशी शक्यता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री नाराज असल्याचं सांगताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या बाजूने असणाऱ्या शरद पवारांकडे ही नाराजी बोलून दाखवली आहे. येणाऱ्या काही दिवसांत बदल दिसू लागतील”.
हे बदल काय असतील याबद्दल बोलताना राष्ट्रवादीच्या मंत्र्याने सांगितलं की, महाविकास आघाडी सरकार विचार करत आहे त्यापैकी एक म्हणजे भाजपाचं सरकार असणाऱ्या काळातील भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे पुन्हा उघडणे. त्यावर विचार केला जात असून सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपादेखील एकीकडे मुंबई महापालिका आणि राज्य सरकारशी संबंधित प्रकरणांवरुन शिवसेनेवर आक्रमकपणे हल्ला करत असताना राष्ट्रवादीविरोधात मात्र मवाळ भूमिका घेत आहे.
२४ मार्चला फडणवीसांनी सभागृहात पोलिसांकडून खंडणीचं रॅकेट चालवलं जात असल्याचं आरोप करताना म्हटलं होतं की, “वरपर्यंत द्यावे लागतात…पण याचा अर्थ मंत्री नाहीत (गृहमंत्री दिलीप वळसे पाटील). मी त्यांना गेल्या २५ वर्षांपासून ओळखतो आणि खात्रीने सांगू शकतो”.
शिवसेना नेत्याने म्हटलं आहे की, “काही भाजपा नेत्यांना राष्ट्रवादीकडे असणाऱ्या खात्यांसंबंधी आरोप केले आहेत, पण ते स्वत: यात सहभागी नाहीत सांगत त्यांना क्लीन चीट दिली आहे. त्याचवेळी शिवसेनेवर मात्र मुंबई पालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचं सांगत हल्ला केला जात आहे”.
राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मात्र, पक्ष भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत नसल्याचा शिवसेनेच्या नेत्यांचा दावा नाकारला आहे. “खरं तर, भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने स्वीकारलेल्या धोरणांवर आम्ही जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आम्ही सातत्याने उघड करत आहोत. राष्ट्रवादीचे दोन ज्येष्ठ नेते कायद्याच्या आक्षेपार्ह कलमांतर्गत आणि केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीच्या बहाण्याने तुरुंगात आहेत. दोन्ही नेते निष्पक्ष खटल्याच्या प्रतीक्षेत आहेत,” असं तपासे म्हणाले.
शिवेसना नेत्याने यावेळी मतभेद असूनही असले तरी सरकारच्या स्थिरतेला कोणताही धोका नसल्याचे सांगितलं आहे. “भाजपाशी लढताना महाविकास आघाडीत काही मतभेद दिसत असले तरी, हा फार मोठा मुद्दा नाही. आघाडी सरकारमध्ये अशा समस्या उद्भवतात आणि चर्चा आणि संवादाद्वारे सोडवल्या जाऊ शकतात,” असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान सत्तेतील तिसरा पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटलं आहे की, “जर कोणी सूडाचे राजकारण करत असेल तर याचा अर्थ असा नाही की आपणही तेच केले पाहिजे”.