मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी पुराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला भेट दिली. दरम्यान शिरोळमध्ये निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांची भेट घेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान मुख्यमंत्री आल्याने गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे पोलिसांनी गर्दी आवरणं कठीण झालं होतं. गावकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी सर्वांनी एकत्र येऊन पुनर्वसनासाठी विनंती करा असं आवाहन केलं.

निवारा केंद्रातील महिलांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, आम्ही ती मागणी मंजूर करु असं आश्वासन दिलं. अन्यथा दरवेळी पाऊस येणार आणि आम्ही तुम्हाला भेटत राहणार असंच सुरु राहील. तुम्हाला पूर आल्यावर दरवेळी निवारा केंद्रात यावं लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना अद्यापही करोनाचं संकट आहे अशी आठवण करुन देताना मास्क लावायला विसरु नका असं आवाहन केलं.

कसा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी १० वाजता कोल्हापूरमध्ये दाखल होणार असून साडेअकरा वाजता शिरोळ-नृसिंहवाडी परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहमी करतील. त्यानंतर पुढे शाहूपूर, गंगावेश, शिवाजी पूल रस्ता आणि आसपासच्या भागात पुरामुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतील. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री पाहणीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.

तीन दिवसांपूर्वी दौरा झाला होता रद्द!

तीन दिवसांपूर्वी म्हणजेच २६ जुलै रोजी मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दौरा करणार होते. रायगडमधील तळीये आणि चिपळूणची पाहणी केल्यानंतर ते सातारा, कोल्हापूरची हवाई पाहणी करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांचं हेलिकॉप्टर साताऱ्यात न उतरता पुण्याला माघारी गेलं.

कोल्हापूरसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे आत्तापर्यंत २१३ जणांचा बळी घडल्याची माहिती स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर आणि डिजास्टर मॅनेजमेंट विभागाने दिली आहे.

Story img Loader