महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय असून पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का अशी चर्चा रंगली आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिलेला असताना महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसने याचा जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. राज्यात कडक निर्बंध लावावेत असा सरकारमध्ये सूर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सायंकाळी पाच वाजता यासंबंधी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

बैठकीनंतर उद्धव ठाकरे रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत यासंबंधी माहिती दिली. यावेळी राज्यात लॉकडाउन लागणार की कडक निर्बंध लावण्यात येतील हे स्पष्ट होणार आहे.

राज्यात रुग्णसंख्या वाढत असून दैनंदिन रुग्णवाढीने गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. गुरुवारी २४ तासांत राज्यात ४३ हजार १८३ नव्या रुग्णांचे निदान झाले, तर २४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक ८६४६ नवे रुग्ण मुंबईत आढळले. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ५३३ झाली असून त्यातील सर्वाधिक ६४,५९९ रुग्ण पुण्यात असून, मुंबईतील ५४,८०७ रुग्णांचा समावेश आहे.

टाळेबंदीऐवजी कठोर निर्बंध!
राज्यातील करोना रुग्णवाढ नियंत्रणात आणण्याचे आव्हान महाविकास आघाडी सरकारपुढे आहे. मात्र, संपूर्ण टाळेबंदीऐवजी सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी परिस्थितीनुरूप कठोर निर्बंधांवर भर देण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार उपनगरीय रेल्वे वाहतूक सध्या तरी सुरू राहील. परंतु, रेस्टॉरंट्स, मॉल्स, सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये आणि पब्ज यांच्यावर तेथील अतिगर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लादले जातील. ५० टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारी उपस्थितीचा नियम काटेकोरपणे पाळला जात असल्याची खात्री करण्याचे आदेश कार्यालयांना दिले जातील, असेही सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्याच्या पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता म्हणाले होते की, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या अनिर्बंध वावरावर अंकुश आणण्यासाठी काही निर्बंध घालण्याचे नियोजन सुरू आहे. ‘‘अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्येत घट झाली नाही तर आम्ही पुढच्या पातळीवरील कठोर निर्बंध लागू करण्याचे पाऊल उचलू’’, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. स्थलांतरीत कामगारांमध्ये घबराट निर्माण होऊन ते पुन्हा आपल्या मूळ गावी जातील, अशी परिस्थिती आम्हाला निर्माण करायची नाही. गेल्यावर्षीसारखी कठीण परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही. परंतु जे लोक नियम धुडकावतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर नियम आणि निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना कृती दलाच्या सदस्यांबरोबर घेतलेल्या आढाव्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी करोनाची दुसरी लाट रोखण्याकरिता कठोर उपायांवर भर दिला होता. गर्दी कमी झाल्याशिवाय रुग्णसंख्या आटोक्यात येणार नाही, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले होते.