मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाहनाचा ताफा राजभवनाकडून वर्षा बंगल्याकडे जात असताना अचानक त्यांच्या ताफ्यात एक अनोळखी कार घुसल्याची घटना घडली. मलबार हिलवरील रस्त्यावर हा प्रकार घडला. ताफ्यात अचानक घुसलेल्या या कारमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
राज्याचे राज्यपाल भगत कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राजभवनावर गेले होते. शुभेच्छा देऊन परत जात असताना जेव्हा मुख्यमंत्र्याच्या गाडीचा ताफा मलबार हिल येथे आला तेव्हा अचानक एका अनोळखी व्यक्तीने आपली गाडी ताफ्यात घुसवली आणि क्रॉस करून विरुद्ध दिशेला पुढे नेली. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण कऱण्यात येत आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून संताप व्यक्त
मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना रस्त्याच्या दोन्हा बाजूंना पोलिसांचा बंदोबस्त असतो. तसेच ताफा जात असताना आजूबाजूच्या गाड्यांना थांबवले जाते. मात्र, मलबार हिलच्या रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता तेव्हा एका व्यक्तीने सुरुवातीला आपली गाडी थांबवली. मात्र, अचानक त्याने ताफ्याच्या मध्येच आपली गाडी घुसवली आणि क्रॉस करत पुढे निघून गेला. अचानक ताफ्यात घुसलेल्या या गाडीमुळे सुरक्षा यंत्रणांचा गोंधळ उडाला आणि काही क्षणासाठी ताफा थांबवण्यात आला. या प्रकारानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने संताप व्यक्त केला आहे.