महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये नियमितपणे राष्ट्रगीताचे गायन केले जावे , असा आदेश राज्यातील उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या आवारात फिरताना तुमच्या कानावर राष्ट्रगीताच्या सुरावटी पडल्यास आश्चर्यचकित होऊ नका. मागील वर्षी छावा या संघटनेने याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राज्य सरकारकडे ही मागणी लावून धरली होती.  देशात फक्त चित्रपटगृहे आणि काही तुरळक ठिकाणीच राष्ट्रगीत गायले जाणे, ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण संपून महाविद्यालयात गेल्यानंतर अचानकपणे राष्ट्रगीताचे समुहगान करण्याच्या परंपरेत खंड पडतो. खरे तर महाविद्यालयीन वयातच विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्राविषयी अभिमानाची भावना रूजवण्याची गरज असल्याचे छावा संघटनेतर्फे सांगण्यात आले होते.