राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं रालोआच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी यासंदर्भातील घोषणा केल्यानंतर यावरुन आता काँग्रेसने नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीचा संदर्भ देत प्रतिक्रिया दिलीय. या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील मतभेद समोर आल्याचं चित्र दिसत आहे. भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला संधी मिळाली असून, आपण त्यांना पाठिंबा दिल्यास आनंद होईल, असा प्रेमळ आग्रह शिवसेनेच्या आदिवासी नेत्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी धरला होता. यामुळेच राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंगळवारी केली. हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावापोटी घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नक्की वाचा >> “राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यश मिळालं असतं तरी…”; शरद पवारांनी सांगितलं उमेदवारी नाकारण्याचं खरं कारण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेनं घेतलेल्या या निर्णयासंदर्भात बोलताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करताना शिवसेनेनं हा निर्णय जाहीर करण्याआधी आमच्याशी चर्चा केली नव्हती असं सांगितलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार थोरात यांनी शिवसेनेनं असा निर्णय का घेतला यासंदर्भात काही कल्पना नसल्याचं नमूद केलंय. “जे संविधान आणि लोकशाहीचं समर्थन करतात त्यांचा यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा आहे. आम्हाला ठाऊक नाही की शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना का पाठिंबा देत आहे. शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असले तरी त्यांनी यासंदर्भात आमच्याशी चर्चा केलेली नाही,” असं थोरात यांनी म्हटलंय.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या खासदारांची बैठक ‘मातोश्री’वर घेतली होती. त्यात शिवसेनेने भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका अनेक खासदारांनी मांडली होती. निर्णयाचे सर्वाधिकार ठाकरे यांना देण्यात आले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा कसलाही दबाव माझ्यावर नव्हता. कोणालाही पाठिंबा जाहीर करा, असे खासदारांनी मला सांगितले होते, असे स्पष्टीकरणही ठाकरे यांनी दिले.

द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत नंदुरबारमधील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, पालघरच्या निर्मला गावित अशा आदिवासी समाजात काम करणाऱ्या अनेक शिवसेना नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विनंती केली. मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली असून आपण त्यांना पाठिंबा दिल्यास आनंद होईल, असा आग्रह या शिवसैनिकांनी केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्ष-आघाडी न पाहता व्यापक विचार करून पाठिंबा देणे ही शिवसेनेची परंपरा आहे, असंही उद्धव यांनी म्हटलेलं.

प्रतिभाताई पाटील यांना महाराष्ट्रातील उमेदवार म्हणून तर प्रणव मुखर्जी यांना त्यांचा राजकीय अनुभव, ज्ञान व देशपातळीवरील प्रतिमा लक्षात घेऊन शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तीच परंपरा कायम ठेवत आता द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता द्रौपदी मुर्मू या भाजपाच्या उमेदवार असल्याने त्यांना मी विरोध करायला हवा होता. पण, मी तेवढय़ा कोत्या मनाचा नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra congress leader balasaheb thorat on shiv sena support draupadi murmu in presidential elections scsg
Show comments