आज अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. ३८ वर्षांच्या राजकीय अनुभवानंतर आज मी नवी सुरुवात करतो आहे असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपात येणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मला योग्य वाटलं म्हणून मी भाजपात आलो असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. राज्यसभेची निवडणूक २८ फेब्रुवारीला होणार आहे. अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसचं नुकसान झालं आहे. एकीकडे अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. तर नाना पटोलेंसह महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.
शरद पवार यांच्या भेटीला काँग्रेस नेते
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी जाऊन काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्यासह नाना पटोले, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात आणि इतर वरिष्ठ नेते होते. शरद पवार यांच्याशी त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली. महाविकास आघाडीबाबत चर्चा झाल्याचं रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे.
“ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील आम्ही चर्चा केली. आम्ही लवकरात जागावाटप निश्चित करु. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाबाबतही चर्चा झालीय. शरद पवार यांच्यासोबत चांगली चर्चा घडून आली. जवळपास दोन तास चर्चा झाली. आम्ही विस्ताराने चर्चा केली आहे. येत्या काळात महाविकास आघाडीचा कार्यक्रम सुरु होईल. आम्ही सर्व एकत्रितपणे काम करु”, असं रमेश चेन्नीथला म्हणाले.
हे पण वाचा- काँग्रेसचा अशोक चव्हाण यांना थेट सवाल; प्रभारी चेन्नीथला पत्रकार परिषदेत म्हणाले, “मी एक सांगतोय…”
रमेश चेन्नीथला यांना राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी देणार? असा प्रश्न उपस्थित केला. पण त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देणं टाळलं. यासाठी आमची आज बैठक आयोजित करण्यात आल्याचं ते म्हणाले. तसेच “राज्यसभेसाठी काँग्रेस हायकमांड निर्णय घेणार. त्यामुळे आम्ही वाट पाहत आहोत. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहेत”, असंही रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं.