लोकसत्ता वार्ताहर

नांदेड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे वैदर्भीय असले, तरी ते नांदेड जिल्ह्याचे जावई आहेत. पण वरील पदावर त्यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये ‘ना हर्ष, ना खंत’ असे अनाकलनीय चित्र दिसले. माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांनी मात्र सपकाळ हे कृतिशील कार्यकर्ते असल्याची प्रशस्ती दिली आहे.

सन २०१४ ते १९ दरम्यान काँग्रेसचे बुलढाण्याचे आमदार राहिलेल्या सपकाळ यांची वरील पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती वेगवेगळ्या माध्यमांतून समोर येत असताना त्यांची सासुरवाडी नांदेड जिल्ह्यातील असल्याचा उल्लेख एका लेखामध्ये दिसून आला. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता या माहितीला दुजोरा देत आपल्या सहचारिणीचे गाव देगलूर तालुक्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या प्रदेश शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सपकाळ यांनी शुक्रवारी सर्वप्रथम काँग्रेसचे माजी खासदार, युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण केले. सपकाळ ज्या काळात आमदार होते, त्या काळात नांदेडमधील ज्या काँग्रेसजनांशी त्यांचा संबंध आला, त्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे आता भाजपवासी झालेले आहेत तर माजी मंत्री डी.पी.सावंत हेही पक्षापासून दूर झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नव्या नियुक्तीची घोषणा शुक्रवारी झाल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकार्‍यांसह प्रमुख कार्यकर्त्यांनीही मौन बाळगल्याचे दिसले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी नांदेडमधील अनेक कार्यकर्त्यांनी जवळीक साधली होती. त्यात प्रामुख्याने राजेश पावडे, केदार पाटील, बालाजी चव्हाण प्रभृतींचा समावेश होता. पक्षाने पटोले यांचा राजीनामा मंजूर केल्यामुळे त्यांचे स्थानिक समर्थक खंतावल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या संघटनात्मक जबाबदार्‍या पार पाडणार्‍या श्याम दरक यांनी मात्र शुक्रवारी दुपारी सपकाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले.

मुकुल वासनिक ते थेट राहुल गांधी

हर्षवर्धन सपकाळ गेली ३० वर्षे काँग्रेस पक्षाशी जोडले गेले आहेत. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्याशी त्यांचं सर्वप्रथम घनिष्ट नातं निर्माण झालं. त्यांच्या माध्यमातूनच त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढील काळात ते काँग्रेस नेते, खा.राहुल गांधी यांच्या निकटच्या वर्तुळात पोहोचले. पक्षासाठी त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये निरीक्षक अथवा प्रभारीपदाची जबाबदारी पार पाडलेली आहे.

Story img Loader