चीन, जपान, अमेरिका, ब्राझील आदी देशांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा करोनाची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारबरोबरच देशांमधील वेगवेगळ्या राज्यांनी याच पार्श्वभूमीवर आढावा बैठकी आणि तयारींची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही मागील काही दिवसांमध्ये आढावा बैठकींमधून राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. याच सर्व पार्श्वभूमीवर माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या टोपेंनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना करोना प्रादुर्भावासंदर्भात मत नोंदवलं. “जे प्रोटोकॉल सांगितले जात आहेत ते फॉलो केलेच पाहिजे. केंद्र शासन जे काही सांगतात ते फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं,” अशी पहिली प्रतिक्रिया राजेश टोपेंनी दिली आहे. तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं होतं तर आता पुन्हा तुमची आठवण काढली जात आहे. ज्यापद्धतीने तुम्ही माहिती घेतली आणि लोकांची काळजी घेतली. अगदी तांत्रिक बाबी समजून घेतल्या. विद्यमान आरोग्यमंत्री अशी परिस्थिती आल्यास संभाळण्यास समर्थ ठरतील, याबद्दल तुमचं मत काय? असा प्रश्न टोपेंना विचारण्यात आला.
आणखी वाचा – देशभरात करोना उपचारांची सज्जता; विविध राज्यांतील रुग्णालयांत सराव
“मला वाटतं दुसऱ्यांबद्दल बोलणं पण योग्य वाटणार नाही. हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही यासाठी मला श्रेय देताय किंवा माझ्या कामाचं कौतुक करत आहात. या सरकारला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मी माझ्या अनुभवाच्या आधारे मदत करायला तयार आहे. जनता आपली आहे. आपण जनतेसाठी काम करतो. माझा अनुभव आहे. तो सगळा अनुभव वापरुन कधीही, कशासाठीही बोलवलं तरी मी मिनिटभरामध्ये जाऊन जनतेच्या हितासाठी मदत करण्यास तयार आहे.”
हेही वाचा – राज्यात करोनाची सक्रिय रुग्णसंख्या कमी; ९८ टक्के रुग्ण ठणठणीत
तुम्ही अजूनही माहिती घेता करोनासंदर्भात तर सध्याच्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? “निश्चितपणे करोनाला गांभीर्याने न घेण्याची सध्याची परिस्थिती नाही. आपण पाहिलं की दुबईवरुन आलेल्या एका जोडप्यामुळे जगभराचा विचार केला तरी महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ही सर्वाधिक झाली होती. त्यामुळे इन्फेक्टीव्ही रेट प्रचंड आहे असं मी ऐकतोय. हा रेट जास्त असल्याने काळजी घेणं गरजेचं. केंद्र सराकराचा आरोग्य विभाग जागृक आहे त्याबद्दल माहिती घेत आहे. प्रत्येक राज्यांनी भारत सरकारचे सल्ले फॉलो करावेत काही अडचण येणार नाही,” असा विश्वास टोपेंनी व्यक्त केला.