स्वतंत्र विदर्भाच्या राज्याच्या मागणीवरून फुटीरतावादी नेते आक्रमक झाले असताना कोकणात मात्र अखंड महाराष्ट्राचा नारा दिला जात आहे. अखंड महाराष्ट्राच्या या मागणीसाठी अलिबागमधील महाविद्यालयीन तरुणांनी समुद्रकिनाऱ्यावर एक वाळुशिल्प साकारले आहे. राज्याच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापुरुषांची शिल्प साकारून महाराष्ट्र दिनाची आगळीवेगळी मानवंदना दिली आहे.
अलिबाग येथील पीएनपी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कलाशिक्षकांनी ही कलाकृती साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, डॉ. श्रीपाद डांगे आणि हुतात्मा स्मारकाची प्रतिकृती या वाळुशिल्पाच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. ५०० चौरस फूट परिसरात हे शिल्प साकारण्यात आले आहे. कलाशिक्षक मितेश पाटील आणि महेंद्र गावंड यांच्या संकल्पनेतून या अभिनव वाळुशिल्पाची निर्मिती करण्यात आली आहे.
राज्याच्या जडणघडणीत ज्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. अशा महामानवांच्या बलिदानाची जाण ठेवा असा संदेश या वाळुशिल्पाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून साकारण्यात आलेल्या या वाळुशिल्पाला पाहण्यासाठी नागरिक आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते मशाल पेटवून या शिल्पाचे अनावरण करण्यात आले. या वेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, अॅड. मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, पीएनपी महाविद्यालयाच्या प्राचार्या संजीवनी नाईक, आदी उपस्थित होते.
जिल्हय़ाला प्रचंड समुद्रकिनारा लाभला आहे. त्यातून ही कला वृिद्धगत करणे सहज शक्य आहे. मात्र कोकणात अद्याप वाळुशिल्पकला विकसित झालेली नाही. या शिल्पाच्या माध्यमातून कोकणात वाळुशिल्पकला करणारे चांगले कलाकार तयार व्हावेत हादेखील यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी महाविद्यालयाच्या वतीने मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर एक वाळुशिल्प साकारण्यात आले होते.
यात अबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ मुलांचा अपघाती मृत्यू आणि किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न याबाबत देखावा साकारण्यात आला होता. वाळुशिल्प हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे शिल्पांच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या वेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा