रायगडात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्य़ात ठिकठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहणाचा आणि संचलनाचा मुख्य समारोह अलिबागच्या पोलीस परेड मैदानावर पार पडला. या वेळी राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे आौचित्य साधून त्यांनी रायगडकरांना या वेळी शुभेच्छा दिल्या.
या वेळी पालकमंत्र्याच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जलतरणपटू लक्ष्मण तारे यांना देण्यात आला. तर तलवारबाजीतील यशासाठी गुणवंत क्रीडापटू म्हणून संदीप गुरव यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय तसेच आंतराराष्ट्रीय स्तरावर शरीरसौष्ठव स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या आणि सध्या पनवेल इथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या सुहास खामकर यांना विषेश क्रीडा पुरस्कार देण्यात आला. शाम अंबाजी यांना आदर्श तलाठी पुरस्काराने या वेळी गौरवण्यात आले. तर २०१३ पोलीस महासंचालकांच्या सन्मानचिन्हाचे वितरण साहाय्यक फौजदार ए. एच. पडते, पोलीस हवालदार पी. जी. पाटील, पोलीस हवालदार डी. एस. म्हात्रे, पोलीस हवालदार एस. पी. पाटील यांना देण्यात आली.
तर राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियानांतर्गत विविध ग्रामपंचायतींना पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले. आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून स्मिता आंग्रे यांचाही गौरव करण्यात आला. पोलीस दल, होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी या वेळी शानदार संचलन केले. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बाल आरोग्य तपासणी करणाऱ्या चार मोबाइल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.  या वेळी जिल्हाधिकारी एच. के. जावळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे अधिकारी वर्ग आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.

Story img Loader